पुणे महापालिकेचा कारभार ठेकेदार चालवितात का?  सत्ताधारी भाजपने तोंडावर बोट

महापालिका आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sarkarnaa Banner (49).jpg
Sarkarnaa Banner (49).jpg

पुणे : एका ठेकेदाराने पुणे जिल्ह्याबाहेरील एका खासदाराच्या मदतीने  राज्यातील प्रभावशाली नेत्यांशी संपर्क साधून पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation कामाचा ठेका आपल्यालाच मिळावा, असा हट्ट धरला.  खासदार आणि राज्यस्तरीय नेत्याने महापालिका प्रशासनाकडे आग्रह केला. त्यानुसार निविदांच्या अटी-शर्ती बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेचा कारभार हा ठेकेदार चालवितात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

समाविष्ट गावांतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या निविदेसाठी राजकीय दबाव आणून निविदेतील अटींमध्ये ठेकेदाराने बदल केल्याचे उघड झाले आहे.  ठेकदारांने अटींमधील बदल पुणेकरांच्या हिताचा नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत महापालिका आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुजरात येथील एका ठेकेदाराच्या हितासाठीच हा सर्व उद्योग सुरू आहे. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी ही निविदा रद्द करावी.
- सुनील टिंगरे, आमदार

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि मैलापाणी वाहिन्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी ही निविदा काढली आहे.  मूळ निविदेमधील अटी- शर्तीमध्ये दुरुस्ती आदेश काढून ठेकेदाराने आपल्या हितासाठी हवा तसा बदल केला आहे. पुणेकरांच्या कराचा पैसा पुणेकरांच्या सुविधांसाठी योग्य पद्धतीने वापरला जात नसल्याचे यावरून दिसते आहे. महापालिकेतील विरोधी पक्षांनी या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे आणि सत्ताधारी भाजपने तोंडावर बोट ठेवले आहे. 

मूळ निविदेच्या अटी-शर्तीमध्ये जे बदल केले आहेत, ते केंद्र आणि राज्य सरकारच्या अध्यादेशाच्या आधारे केले आहेत, तसेच त्यास आयुक्तांनीदेखील मान्यता दिली आहे. 
- कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

महापालिकेतील अधिकाऱ्याने ठेकेदारांना आणले एकत्र  
दोन कंपन्यांच्या भागीदारीत हे काम देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यामध्ये एक ठेकेदार हा महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीतील आहे, तर दुसरा ठेकेदार हा पश्‍चिम महाराष्ट्रातील एका खासदाराचा वर्गमित्र आहे. अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदाराची कंपनी ही सांडपाणी प्रकल्प बांधण्याचे काम करते, तर खासदाराच्या मर्जीतील ठेकेदार हा रस्ता आणि सांडपाणी वाहिन्यांचे काम घेतो. त्यामुळे या दोन्ही ठेकेदारांना एकत्र आणणे आणि त्यांना निविदा भरण्यास लावण्यामागे या अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

ठेकेदार महत्त्वाचा की शहर, हे आता ठरविण्याची वेळ आली आहे. ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे अटी-शर्तीत बदल होत असेल, तर प्रशासनाची गरज काय?
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com