कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना कोरोनाची लागण  - Congress MLA Sangram Thopte infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना कोरोनाची लागण 

विजय जाधव 
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

 या दोघांवरही सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

भोर : कॉंग्रेस पक्षाचे भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि त्यांच्या पत्नी स्वरुपा थोपटे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आमदार थोपटे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. या दोघांवरही सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

दरम्यान, माझ्या संपर्कात आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार संग्राम थोपटे यांनी केले आहे. तसेच, कोरोनावर मात करून लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघात कामांसंबंधी दौरे करावे लागले. यादरम्यानच्या काळात मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली, त्यामुळे मी माझी कोरोनाची चाचणी करवून घेतली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याच सोबत माझ्या पत्नीचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आमची प्रकृती उत्तम, ठणठणीत असून आम्ही उपचार घेत आहोत. आपण काही काळजी करू नये. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, आमदार थोपटे यांची कोरोनातून लवकर मुक्तता व्हावी, यासाठी तालुक्‍यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी देवाकडे प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून प्रार्थनेचे मेसेज पाठविण्यास सुरुवातही केली आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख