महाआघाडी सत्तेवर आली आणि वळसे पाटील-आढळरावांमधील मैत्रीचे सूर पुन्हा जुळले!

आंबेगावतालुक्यातील जवळपास सर्वच निर्णय वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढळराव पाटील व शहा घेत होते.
Closeness between Dilip Walse Patil and Shivajirao Adhalrao Patil grew
Closeness between Dilip Walse Patil and Shivajirao Adhalrao Patil grew

मंचर (जि. पुणे) : खेड तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत वादाच्या ठिणग्या पडत असताना शेजारच्या आंबेगाव तालुक्यात मात्र दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मात्र एकत्र नांदत आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून एकमेकांच्या जवळ आल्याचे दिसत आहे. एकमेकांच्या विरोधात अजिबात न बोलता कार्यक्रमात विशेषतः कोविड साथ रोखण्यासाठी झालेल्या विविध बैठकांना हजेरी लावून एकमेकांना मदत करत असल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे. (Closeness between Dilip Walse Patil and Shivajirao Adhalrao Patil grew)

दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील व शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा हे एकमेकांचे एकेकाळचे परममित्र. भीमाशंकर सहकरी साखर कारखान्याचे अध्यक्षपदावर आढळराव पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या भैरवनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी देवेंद्र शहा यांना विराजमान करण्यात आले होते. आंबेगाव तालुक्यातील जवळपास सर्वच निर्णय वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढळराव पाटील व शहा घेत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री वळसे-पाटील असताना अनेक शासकीय बैठकाही आढळराव पाटील यांच्या उपस्थितीतच पार पडत होत्या. 

मात्र 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असूनही काँग्रेसकडून आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होऊन थेट शिवसेनेत गेले आणि निवडूनही आले. तेव्हापासून वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. त्याची झळ शहा यांनाही वेळोवेळी बसत होती. शहा यांनी वळसे पाटील यांची बाजू भक्कम करण्याचे काम वेळोवेळी केले. आढळराव पाटील सलग तीन वेळा लोकसभेत निवडून आले. चौथ्यांदाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले होते. 

ज्येष्ठ नेते शरद पवार व दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय रणनीती आखून छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांना आढळराव पाटील यांच्या विरोधात निवडणुकीला उभे करून निवडून आणले. तेव्हापासून तर आढळराव पाटील व वळसे पाटील यांच्यातील वाद वाढत गेला. पण, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. तेव्हापासून विरोधासाठी विरोध नाही, अशी भूमिका आढळराव-पाटील यांनी आंबेगाव तालुक्यात समर्थपणे पार पाडली आहे. वळसे-पाटील हे त्यांना आवर्जून विविध कार्यक्रमांना निमंत्रण देतात. आढळराव पाटीलही कार्यक्रमात आल्यानंतर वळसे-पाटील यांचा आदरपूर्वक उल्लेख करतात. 

मंचर ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी देवेंद्र शहा, बाळासाहेब बेंडे, राजाराम बाणखेले, सुनील बाणखेले यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांना वळसे-पाटील व आढळराव पाटील यांनी सहमती देऊन पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये होणारे वादंगाचे आवाज तूर्त तरी थांबले आहेत. 

उपजिल्हा रुग्णालयाच्या आज (ता. २१) झालेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम, माजी आमदार पोपटराव गावडे, मोरडे फूड्सचे संचालक हर्शल मोरडे यांच्या उपस्थितीत एकमेकांच्या शेजारी बसलेले वळसे-पाटील व आढळराव पाटील यांच्यातील हितगुज सर्वांच्याच नजरेत भरत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com