मोतेवारांनी दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार "सीआयडी'कडून जप्त - CID seizes gold necklace donated by Motewar to Dagdusheth Ganpati | Politics Marathi News - Sarkarnama

मोतेवारांनी दगडूशेठ गणपतीला अर्पण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार "सीआयडी'कडून जप्त

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

सव्वा किलोचा सोन्याचा हार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) जप्त केला.

पुणे : समृद्ध जीवन फुडस्‌च्या महेश मोतेवार याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अर्पण केलेला सव्वा किलोचा सोन्याचा हार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) जप्त केला. या सव्वा किलो सोन्याच्या हाराची किंमत 58 ते 60 लाख रुपये इतकी असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून संबंधीत सोन्याचा हार "सीआयडी'कडे सुपुर्द करण्यात आला.

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागामध्ये शेळीपालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून समृध्द जीवन फुडसच्या महेश मोतेवार याने हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. त्यानुसार, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रासह अन्य राज्यातही गुन्हे दाखल झाले होते. सध्या महेश मोतेवार ओडिशामधील कारागृहात आहे.या प्रकरणाचा तपास सध्या "सीआयडी'कडून केला जात आहे. "सीआयडी'चे अतिरीक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मोतेवार याने केलेल्या गुन्ह्याचा तपास "सीआयडी'च्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. मोतेवारने गुंतवणूदारांना फसवणूक मिळवलेल्या पैशांची कोठे कोठे गुंतवणूक केली आहे, याचा तपास करण्यात येत आहे. त्याचा शोध सुरू असतानाच आम्हाला एक छायाचित्र सापडले, त्यामध्ये मोतेवार हा दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या श्रींच्या मुर्तीस हार अर्पण करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, हा हार जप्त करण्यात आला आहे. शेतकरी व इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून हा हार खरेदी केला गेला आहे.

यासंदर्भात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी म्हणाले, "मोतेवार याने सप्टेंबर 2013 मध्ये श्रींना अर्पण केलेल्या संबंधीत सोन्याच्या हाराबाबत सीआयडी'ने आमच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी आपले मंडळ हे सार्वजनीक ट्रस्ट असल्याने आम्ही त्यांना धर्मादाय कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी त्यांनी सहधर्मादाय आयुक्तांकडून पत्र आणल्यानंतर आम्ही सोमवारी त्यांच्याकडे 58 ते 60 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हार सुपुर्द केला.''

Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख