चंद्रकांत पाटलांना स्वप्नातही अजित पवार दिसतात : चेतन तुपे - Chandrakant Patil sees Ajit Pawar even in his dreams : Chetan Tupe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

चंद्रकांत पाटलांना स्वप्नातही अजित पवार दिसतात : चेतन तुपे

उमेश घोंगडे
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

चंद्रकांत पाटील यांना स्वप्नातही अजित पवार दिसू लागलेत," अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी केली आहे.

पुणे : "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका पाहून येत्या महापालिका निवडणुकीत काय होणार याची आयडिया चंद्रकांत पाटील यांना आली आहे. त्यामुळे ते घाबरले असून घाबल्यानंतर जे होतं ते चंद्रकांत पाटील यांचं होत आहे. त्यांना स्वप्नातही अजित पवार दिसू लागलेत," अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी केली आहे.

पुण्यातल्या सत्तेची स्वप्ने पाहात पुण्यात उर्जा वाया घालवू नका. आम्ही तुमचे बाप आहोत, या शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांना आव्हान दिले होते. पाटील यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत शहराध्यक्ष आमदार तुपे यांनी पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. 

तुपे म्हणाले, "चंद्रकांत पाटील हे एका मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी अशा प्रकारची भाषा करणे योग्य आहे का ? गेल्या साडेतीन वर्षात काय पद्धतीने यांनी पुण्यात सत्ता राबविली आहे हे पुणेकरांनी पाहिले आहे. मुळात निवडणुकीआधी प्रभाग तयार करताना अनेक चुकीच्या गोष्टी यांनी केल्या आहेत.

केवळ स्वत:च्या सोयीने प्रभागांची रचना केली. इतर पक्षांचे उमेदवार पळवून महापलिकेत सत्ता आणली. आता प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत बाजी मारल्याची फुशारकी मारली जात आहे. मात्र, प्रभाग समित्या मिळविण्यासाठी यांनी प्रभागांची ज्या अनैसर्गिकपणे मोडतोड केली तशी यापूर्वी कधीच केलेली नाही. 15 पैकी 11 प्रभाग समित्या आपल्या ताब्यात ठेवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यासाठी किती चुकीच्या गोष्टी केल्या याचीही चर्चा व्हायला हवी. जी भाषा चंद्रकांत पाटील बोलत आहेत ती पुणेकर ऐकत आहेत. यांचा गेल्या साडेतीन वर्षातील महापालिकेतील कारभारदेखील पुणेकर पाहात आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत पुणेकर त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.

कात्रजमधील पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्या टाकीचे उद्धघाटन अजित पवार यांच्या हस्ते ठेवण्यात आले. मात्र, ते होऊ नये तसेच या कामाचे श्रेय लाटण्यासाठी त्याचदिवशी आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात माजी आमदार, नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या वर्तनामुळे यांना पोलिसांनी अटक केली. केवळ पाणी पुरवठ्याच्या टाकीचे श्रेय घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने आंदोलन केले व त्या माध्यमातून उद्घटान कार्यक्रम लांबणीवर टाकायला लावला ही यांची राजकारणाची पद्धत आहे. येत्या निवडणुकीत पुणेकर जनता यांच्या कार्यपद्धतीबाबत जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार चेतन तुपे यांनी म्हटले आहे.
Edited  by : Mangesh Mahale  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख