चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल - Case registered against Maharashtra BJP president Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मार्च 2021

भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

पुणे : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बचे प्रकरण राज्यात गाजत आहे. भाजपकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पुण्यातील रुग्णसंख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे शहरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच काल भाजपने देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात आंदोलन केले. 

देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपकडून काल राज्यभर आंदोलन करण्यात आले. पुण्यातील लोकमान्य टिळक चौकामध्ये भाजपकडून करण्यात आलेल्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पाटील यांच्यासह भाजपच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा : अनिल देशमुख यांना अटक करावी लागेल

आंदोलनामध्ये भाजपेच शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर, ओबीसी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, शहर भाजपा सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दीपक पोटे, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, महिला शहराध्यक्ष अर्चना पाटील, युवामोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी हजर होते. 

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येऊ लागल्यानंतर परमवीरसिंग खोटे बोलत आहेत, अशी भूमिका राज्य सरकार घेत आहे. मात्र, यातील खरी गोष्ट आता राज्यातील जनतेच्या ध्यानी आली आहे. परमवीसिंग खोटे बोलत आहेत अशी बतावणी करणाऱ्या सरकारने या साऱ्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात केली.

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलाच पाहिजे या शिवाय या संपूर्ण प्रकरणात संपूर्ण सरकार म्हणून उद्धव ठाकरे यांनी काही जबाबादरी घेतली पाहिजे. हे संपूर्ण सरकार भ्रष्ट असल्याची राज्यतील जनतेची भावाना झाली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यावर शंकर कोटी रूपयांच्या खंडणीचा आरोप होतो ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारे नाही याची जाणीव राज्य सरकारला नसली तरी राज्यातील सामान्य जनता संतापली आहे याचे किमान भान तरी सरकारने ठेवायला हवे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले होते.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख