अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभांत 70 टक्के उपस्थिती महिलांची असायची!...त्यामुळे... - campaign rallies of Amol kolhe mainly were attended by women | Politics Marathi News - Sarkarnama

अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभांत 70 टक्के उपस्थिती महिलांची असायची!...त्यामुळे...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

कोल्हे यांच्या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन 

पुणे : डाॅ. अमोल कोल्हे यांच्या ऐतिहासिक मालिकांचा प्रभाव इतका होता की त्यांच्या प्रचारसभांना 70 टक्के उपस्थिती महिलांची होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मते मिळण्यात काही अडचण आली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हे यांच्या प्रचारसभांचा अनुभव सांगितला.

'राजा शिवछत्रपती' या मालिकेतील शिवरायांच्या भूमिकेबाबत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या अनुभवकथनातून व डॉ नीतीन आरेकर यांच्या लेखणीतून साकारलेली साहित्यकृती `शिवगंध` ऑनलाईन प्रकाशन सोहळा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्या वेळी पवार यांनी कोल्हे यांचा नारायणगाव परिसर, त्यांच्या मालिका, कोल्हे यांचे गुरू रवी बापट यांच्याविषयी नेमक्या शब्दांत आठवणी सांगितल्या. खासदार सुप्रिय सुळे या वेळी उपस्थित होत्या. 

ते म्हणाले की कोल्हे ज्या जुन्नर परिसरातून येतात तो समृद्ध शेतीचा परिसर आहे. मुंबईतील फुलांचा व्यापार करणारी बहुतांश मंडळी ही जुन्नरमधील असतात. वैद्यकीय शिक्षण घेऊन देखील कोल्हे अभिनयाच्या क्षेत्राकडे का वळाले,  असा मला प्रश्न पडला होता. पण नंतर लक्षात आले की ते इकडे येणार नाही मग कुठे जाणार? कारण ते ज्या नारायणगाव भागातून येतात ते नारायणगाव हे तमाश पंढरी म्हणून ओळखले जाते. राज्यभरातील तमासगीर मंडळी वर्षभरातून एकदा नारायणगावात येतात आणि आपले वर्षभराचे कार्यक्रम येथे ठरवितात. त्यामुळे तेथील कलात्मक वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर झाला नसेल तरच नवल.

माझी मित्र डाॅ. रवी बापट यांनी मला पहिल्यांदा कोल्हेंविषयी सांगितले. कोल्हेंच्या मालिकांचा प्रभाव फार होता. त्यांच्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी मी फिरलो. तेव्हा त्या सभांना 70 टक्के उपस्थिती महिलांची असायची. कारण त्यांनी साकारलेले `संभाजीराजे` हे घराघरांत पोहोचले होते. निवडून आल्यानंतर कोल्हे हे संसदेत कशी जबाबदारी पार पाडणार, याची शंका होता. पण खासदारकीच्या पहिल्याच वर्षी चांगली कामगिरी करून संसदरत्न हा किताबही त्यांनी पटकावला. तेथेही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली, अशा शब्दांत पवार यांनी कौतुक केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख