राष्ट्रवादीचे सहकारावरील वर्चस्व मोडीत काढा  - Break the NCP's dominance on the co-operative sector : Shivajirao Adhalrao | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे सहकारावरील वर्चस्व मोडीत काढा 

डी. के. वळसे पाटील 
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सोसायट्या आणि इतर सहकारी संस्थांवर वर्षांनुवर्षे तीच तीच लोक ठाण मांडून बसली आहेत.

मंचर (जि. पुणे) : सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खरा जीव आहे. राष्ट्रवादी पक्ष त्यावरच वाढला आहे. सोसायट्या आणि इतर सहकारी संस्थांवर वर्षांनुवर्षे तीच तीच लोक ठाण मांडून बसली आहेत. बाजार समिती, जिल्हा बॅंक हा राष्ट्रवादीचा पाया आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गावपातळीवरील राजकारणात लक्ष देऊन सहकार क्षेत्रावरील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करावे, असे आवाहन माजी खासदार, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसैनिकांना केले. 

आंबेगाव तालुका शिवसेनेची आढावा बैठक एकलहरे (ता.आंबेगाव) येथे झाली. त्या बैठकीत आढळराव पाटील बोलत होते. ते म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावा बैठक घेऊन पदाधिकारी व शिवसैनिकांची मते व समस्या जाणून घेण्याचे काम करीत आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे. प्रस्थापितांची राजकारणातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपापल्या गावात शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित करावे. 

कोरोना काळात शिवसेना पक्ष व भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून किराणा किट व अत्यावश्‍यक साहित्याचे जिल्हाभर वाटप केले. निसर्ग चक्रीवादळातही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देत नुकसानीच्या पंचनामे तत्काळ करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या. हा अहवाल पाठविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तत्परतेने दहा हजार कोटींची मदत जाहीर केली. पण जिल्ह्यात शिवसेनेला टाळून मुख्यमंत्र्यांचा फोटोही न टाकता ही मदत फक्त आणि फक्त राष्ट्रवादीने केली, असा चुकीचा प्रचार राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींकडून सध्या सुरु आहे, असा आरोपही आढळराव पाटील यांनी या वेळी केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे. काम करणाऱ्या तरुणांना पक्षात नक्कीच संधी दिली जाईल. पदाधिकाऱ्यांनी शिवसेना वाढीसाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा प्रमुख माऊली कटके यांनी केले. 

या वेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, देविदास दरेकर, अरुण गिरे, सचिन बांगर, सुनील बाणखेले, राजाराम बाणखेले, श्रद्धा कदम, शिवाजी राजगुरू, सागर काजळे, विजय आढारी, मालती थोरात, संतोष डोके, दिलीप पवळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख