डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवणार : गृहमंत्री वळसे पाटील - Bodies of accident victims in Mulshi taluka will be identified by DNA test : Home Minister Walse Patil | Politics Marathi News - Sarkarnama

डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवणार : गृहमंत्री वळसे पाटील

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 जून 2021

चौकशी अहवाल मिळाल्यावर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

पिरंगुट (जि. पुणे) : मुळशी तालुक्याच्या पिरंगुट एमआयडीसीतील उरवडे (ता. मुळशी) येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत कामगारांच्या मृतदेहांचा पूर्ण कोळसा झाल्याने ओळख पटवणे कठीण जात आहे. त्यामुळे सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. ओळख पटल्यानंतर सर्व मृतदेहांना एकत्र अग्नी द्यायचा की नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचे, याचा निर्णय त्या परिस्थितीवर ठरविला जाणार आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. (Bodies of accident victims in Mulshi taluka will be identified by DNA test: Home Minister Walse Patil)

दरम्यान, एसव्हीएस ॲक्वा कंपनीचे संचालक निकुंब शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडेही चौकशी सुरू आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले. 

पिरंगुट औद्योगिक परिसरातील उरवडे येथील एसव्हीएस ॲक्वा कंपनीला सोमवारी (ता. ७ जून) लागलेल्या आगीत सतरा जण मृत्युमुखी पडलेले आहेत. गृहमंत्री वळसे पाटील यांनी आज (ता. ८ जून) सकाळी कंपनीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. 

हेही वाचा :  अजित पवारांनी दिले आगीच्या चौकशीचे आदेश : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, उरवडे येथील दुर्घटनेची चौकशी करण्याचे काम सुरू आहे. चौकशी अहवाल मिळाल्यावर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज (ता. ८ जून) मिळणार आहे. कंपनीचे संचालक निकुंब शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडेही चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, तहसीलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सविता दगडे, राजाभाऊ हगवणे, शंकर मांडेकर, महादेव कोंढरे, गंगाराम मातेरे, पांडुरंग ओझरकर, विजय केदारी, अमित कंधारे, शांताराम इंगवले, सुनील चांदेरे, अंकुश मोरे, दीपाली कोकरे, राहुल जाधव आदी उपस्थित होते. 

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आगीसारख्या घटना घडू नयेत, त्यासाठीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पिरंगुट औद्योगिक परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राची अत्यंत आवश्यकता आहे. त्यादृष्टीनेही आमचे प्रयत्न सुरू आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख