पुण्यात `या`अनोख्या आंदोलनाद्वारे भाजप वेधणार लक्ष  

कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता. २२ मे) सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.
pune bjp will protest against state government
pune bjp will protest against state government

पुणे : शहरातील भाजपचे तीन हजार प्रमुख कार्यकर्ते आपापल्या घराच्या दारात उभे राहून राज्य सरकारचा निषेध करणारे फलक दाखविणार आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन केले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. 

मुळीक म्हणाले की, कोरोनाची स्थिती निर्माण झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आपत्कालीन व्यवस्थेत मदत आणि विविध प्रकारचे सेवा कार्य करीत आहेत. कोरोना रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भाजपची भूमिका आहे. हे सहकार्य यापुढेही कायम राहील. परंतु राज्य सरकारचे पुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून, पुण्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहेत. या बेजबाबदारपणाकडे शासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधणे हा या आंदोलनाचा हेतू आहे.

ससून सर्वोपचार रूग्णालयात कालपर्यंत ४६९ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दाखल केलेल्या रुग्णांपैकी ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच ससूनमध्ये दाखल झालेल्या ४ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, या मोठ्या राज्यांत मृत झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा ससूनमधील मृतांची संख्या खूप मोठी आहे. तसेच, कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येच्या तुलनेत मृतांचे प्रमाणही मोठे आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याकडे सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते त्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे मुळीक यांनी सांगितले. 

कोरोना विषाणूमुळे पुणे शहरात निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य सरकार आणि प्रशासनाला आलेल्या अपयशाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहर भाजपच्या वतीने आज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


अधिकाऱ्यांमुळे संभ्रमाचे वातावरण 

पुणे शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ७ आयएएस दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, परंतु त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे प्रत्येक अधिकारी वेगवेगळे आदेश काढत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश येत असल्याची टीका शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

कंटेन्मेंट झोनमध्ये शिधा पॅकेट नाहीत 

कंटेन्मेंट झोनमध्ये ८० हजार कुटुंबांना शिधा पॅकेट वितरण करण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने एक आठवड्यापूर्वी केली होती. परंतु आठवड्यानंतर जेमतेम २० हजार पॅकेट वाटण्यात आली आहेत. त्यामुळे या विभागात नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. नागरिक बाहेर पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने या भागातील नागरिकांना तातडीने पॅकेटस वाटण्याची व्यवस्था करावी अशी सुचना खासदार गिरीश बापट यांनी केली.

विकासकामांना गती द्या 

पुणे शहरात मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड प्रकल्प, रस्ते विकास, उड्डाणपूल आदी अर्धवट अवस्थेत असलेली विकासकामे तातडीने सुरू करावीत, महापालिकेची रुग्णालये सुसज्ज करावीत, पावसाळ्यापूर्वी करावयाच्या अत्यावश्यक कामांचे तातडीने नियोजन करावे, कचरा व्यवस्थापनाच्या कामांना गती द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com