68 जणांच्या कार्यसमितीत प्रा. मेधा कुलकर्णी यांना स्थान

त्यांच्याबरोबर योगेश गोगावले, गणेश बीडकर, श्वेता शालिनी यांना प्रदेश कार्यसमितीत संधी देण्यात आली आहे.
bjp ex mla medha kulkarni appointed on state working committee
bjp ex mla medha kulkarni appointed on state working committee

पुणे: विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना आज जाहीर झालेल्या भाजप प्रदेश कार्यसमितीत स्थान देण्यात आले आहे. या समितीत 68 सदस्य आहेत.

त्यांच्याबरोबर योगेश गोगावले, गणेश बीडकर, श्वेता शालिनी यांना प्रदेश कार्यसमितीत संधी देण्यात आली आहे. आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर दीपक मिसाळ, शेखर मुंदडा, विकास रासकर यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. माजी खासदार प्रदीप रावत यांना बुद्धीजीवी प्रकोष्ठचे संयोजक तर माजी आमदार योगेश टिळेकर यांची ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मेधा कुलकर्णी या 2014 मध्ये कोथरूड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला, मात्र त्यांचे तिकीट कापले गेले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्ये उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याने मेधा कुलकर्णींची निराशा झाली. त्या संतप्त झाल्या होत्या. त्यांना इतर पक्षांनी ऑफर दिल्या होत्या, मात्र त्यांनी त्या स्विकारल्या नाहीत. त्यांनी पक्षाचा प्रचार केला, मात्र चंद्रकांत पाटील जे लाखाच्या मताधिक्याचा दावा करत होते, तसा विजय त्यांना मिळाला नाही. त्यांचे मताधिक्य 30 हजाराच्या आत आले. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत असताना त्यांना काही शब्द देण्यात आला होता. त्यामुळे मे मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांना तिकीटाची अपेक्षा होती, मात्र त्यांना डावलण्यात आले. त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यापार्श्वभुमीवर त्यांना आता प्रदेश कार्यसमितीवर स्थान देण्यात आले आहे.

प्रदेश उपाध्यक्ष पदावरून महाडिकांना वगळले 

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नव्या कार्यकारिणीची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. यात विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची निवड करण्यात आली. श्री. महाडिक यांना प्रदेश कार्यसमितीचे निमंत्रित सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे.दरम्यान, नव्या कार्यकारिणीत श्री. हाळवणकर यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, 'गोकुळ' चे संचालक बाबा देसाई, सम्राट महाडिक यांची वर्णी लावण्यात आली आहे. श्री. जाधव व श्री. महाडिक यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी तर श्री. शेळके व श्री. देसाई यांची प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्य म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com