पुण्यात अभासी पद्धतीने पक्ष चालविणाऱ्या भाजपला निष्ठावंतानीच दिला झटका... - BJP defeated in Pune graduate constituency due to displeasure of party workers | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात अभासी पद्धतीने पक्ष चालविणाऱ्या भाजपला निष्ठावंतानीच दिला झटका...

उमेश घोंगडे
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

संघटना केवळ ‘हायटेक’ होऊन चालत नाही. त्याला निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळाची गरज असते ही या निवडणुकीची शिकवण पुणे शहर भाजपा मानणार का हा खरा प्रश्‍न आहे.

पुणे : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातल्या पराभवाने पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या संघटनेतील दोष समोर येऊ लागले आहेत. गेल्या महिन्यात ही संघटना रस्त्यावर काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची न राहता अभासी पद्धतीने पक्ष चालविणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटना झाल्याची टीका होऊ लागली आहे. संघटना केवळ ‘हायटेक’ होऊन चालत नाही. त्याला निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळाची गरज असते ही या निवडणुकीची शिकवण पुणे शहर भाजपा मानणार का हा खरा प्रश्‍न आहे.

यंत्रणा कितीही प्रभावी असली नियोजन कितीही नेटके असले आणि तंत्रज्ञानाचा वापर कितीही प्रभावी असला तरी कोणत्याही पक्षासाठी निष्ठावंत कार्यकर्ता हेच खरे बळ असतो, हा महत्वाचा गाभा शहर भाजपा गेल्या काही महिन्यात विसरत चालल्याचे दिसते. या निवडणुकीच्या निकालामुळे होणाऱ्या चिंतणात पक्षाचे धुरीन यावर नक्की विचार करतील, असे सांगण्यात येत आहे. निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी साऱ्यांना भाजपाचा आदर्श सांगितला जातो. मात्र, या निवडणुकीच्या निकालाने हे सारे आदर्श धुळीस मिळाल्याची भावना सामान्य निष्ठावंत व्यक्त करू लागले आहेत. 

गेल्या काही महिन्यात पुण्यात पक्ष संघटनेत झालेल्या नेमणुका या केवळ अभासी पद्धतीने पक्ष चालवू पाहणाऱ्यांच्या झाल्या आहेत, असा आरोप करणारा वर्ग आता दबक्या आवाजात बोलू लागला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यावर त्यांची पकड निर्माण होऊ लागली. पक्ष संघटनेत खासदार गिरीश बापट वा अन्य कुणाला फारसा आधिकार राहिला नाही. पाटील यांना कोथरूडमधून विधानसभा लढविण्याचा आग्रह पक्षाकडून करण्यात आल्याने त्यांनी निवडणूक लढविली. त्यात त्यांना यशदेखील आले. मात्र. माजी आमदार मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या. आपली संधी हिसकावून घेण्यात आल्याची त्यांची भावना झाली.

आमदारकची संधी गेल्यानंतर इतर कोणत्याही पदासाठी पक्षाने त्यांची दखल घेतलेली नाही. माजी आमदार कुलकर्णी यांचे उदाहरण केवळ वानगीदाखल आहे. मात्र, पक्षात इतर पदांच्या वाटपात पक्षाचे अनेक छोटे-मोठे कार्यकते नाराज झाले आहेत. त्यांना आपली नाराजी सांगताही येत नाही, अशी परिस्थती आहे. मात्र, न सांगता येणारी नाराजी या निष्ठावंतांनी या निवडणुकीत निष्किय राहून दाखविली आहे.

पदवीधराचा निकाल लागला आहे. या निकालातून शहराची पक्ष संघटना काय बोध घेणार हा खरा प्रश्‍न आहे. महापालिका निवडणूक जेमतेम वर्षभरावर आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत पक्षाला पुण्यात ऐतिहासिक यश मिळाले आहे. गेल्या चार वर्षात भाजपाला महापालिकेच्या सत्तेत फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे गेल्यावेळी मिळालेले यश टिकवायचे कसे हे मोठे आव्हान पक्षासमोर असून राज्याबरोबरच पुण्याचे नेतृत्व करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा यात कस लागणार हे नक्की.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख