पारगाव (जि. पुणे) : "माझे घर रस्त्यावर असल्याने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख प्रचारासाठी घरी आले; म्हणून त्याचा कोणीही गैरअर्थ काढू नये,' असे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
शिवसेना शिरूर लोकसभा मतदार संघाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि प्रा. जयवंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आढळराव पाटील बोलत होते.
आढळराव म्हणाले की, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आमचे मतभेद असतील. तसेच, त्यांनी अद्याप पुणे मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराच्या नियोजनात सहभागी करुन घेतले नसले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातील शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी झटून कामाला लागले आहेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. प्रचाराच्या नियोजनाबाबत खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा फोन आला होता.
"पुणे विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा प्रमुख घटक या नात्याने शिवसेना कोठेही कमी पडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकरी व सर्व सामान्यांच्या हिताचे उत्तम निर्णय घेत आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार पहिल्या पसंतीचे मतदान मिळवून भरघोस मतांनी विजयी होतील,' अशी खात्रीही आढळराव यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेच्या वतीने मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी मतदारांशी संपर्क साधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान मिळवून देण्यासाठी जोमाने कामाला लागावे. राज्य कठीण प्रसंगातून जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या हिताचे व आरोग्यासह सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय घेऊन लोकांची मने जिंकली आहेत. पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आपल्या पाठीशी आहे. त्यासाठी सरकारदरबारी योग्य भूमिका मांडणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके म्हणाले, ""शिवसेना हा आदेशावर चालणार पक्ष आहे. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे शिवसेना आणि शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात कुठेही कमी पडणार नाही.''
उमेदवार अरुण लाड यांचे बंधू हृदयनाथ लाड म्हणाले, ""या निवडणुकीसाठी पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असल्याने या ठिकाणी वेळेअभावी पोहोचण्यास उशीर झाला. माजी खासदार आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी घेतलेला निर्णय पाहता महाविकास आघाडीचे दोन्ही उमदेवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील.
या वेळी जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, ज्येष्ठ नेते प्रा. राजाराम बाणखेले, शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे, आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, गणेश जामदार, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, अनिल काशिद, पोपट शेलार, रवींद्र करंजखेले, युवासेना विस्तारक सचिन बांगर, प्रवीण थोरात, विजय आढारी, शिवाजी राजगुरू, उपसभापती ज्योती अरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

