राष्ट्रवादीवर नाराज आढळरावांची भाजप उमेदवाराने घेतली भेट  - BJP candidate meets Adhalrao who is upset with NCP | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीवर नाराज आढळरावांची भाजप उमेदवाराने घेतली भेट 

सुदाम बिडकर 
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

या भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

पारगाव (जि. पुणे) : महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात एकत्र असले तरी शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अधूनमधून राष्ट्रवादीवर टीका करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेत आंदोलनही केले होते. राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या आढळरावांची आज (ता. 26 नोव्हेंबर) पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी भेट घेतली. 

दरम्यान, विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी मंचर येथे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते या भेटीच्या वेळीही उपस्थित होते, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. 

राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील विधान परिषदेची निवडणुक अवघ्या काही दिवसावर आली आहे पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडी व भाजपाच्या उमेदाराचा प्रचार जोरात सुरु आहे. भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख हे आज आंबेगाव तालुक्‍याच्या प्रचारदौर्यावर असताना त्यांनी शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट घेतल्याने विविध तर्कवितर्क लढविले जात आहे. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. पण, पुणे जिल्ह्यात विशेष करुन शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अजूनही मनोमिलन झाल्याचे दिसत नाही. 

राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढविण्याचा निर्णय घेऊन प्रचारही जोरात सुरु आहे. मंचर येथे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थित महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

आंबेगाव तालुक्‍यात गेल्या कित्येक वर्षांनंतर प्रथमच राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून एकत्रित आल्याचे दिसले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आंबेगाव तालुक्‍यातुन प्रचंड मताधिक्‍य मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. 

त्यानंतर दोन दिवसांत आज (गुरुवारी) भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आंबेगाव तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी घोडेगाव, लांडेवाडी व मंचर येथे भेट देऊन अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. या दरम्यान त्यांनी शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी तालुक्‍यातील भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला शिवसेनेचे जे पदाधिकारी उपस्थित होते. तेच पदाधिकारी भाजप उमेदवाराच्या भेटीदरम्यान उपस्थित होते. या भेटीने विविध तर्क लढवले जाऊ लागले आहेत. मध्यंतरी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली होती. 

माझे निवासस्थान रस्त्यावर आहे. माझी मोठी शिक्षण संस्था आहे, त्यामुळे रस्त्याने जात असताना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे माझ्या निवासस्थानी आले होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, ही आपली संस्कृती आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या मुलाचाही आज फोन आला होता, तेही दोन दिवसांत भेटायला येणार असल्याचा निरोप आला आहे. देशमुख उमेदवार आहेत, ते प्रचार करणारच, यात काही विशेष नाही. त्यांनी आज घोडेगाव येथील जनता विद्यालयाला भेट दिली. तेथेही शिक्षणसंस्थेशी निगडित राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे काही पदाधिकारी उपस्थित होते, असे समजते. मंचर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

-शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार, शिवसेना नेते 

भाजपचे उमेदवार आज आंबेगाव तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले असता आम्ही तालुक्‍यात ज्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत. तेथे मतदार मोठ्या प्रमाणात असतात, अशा ठिकाणी आम्ही भेटी दिल्या आहे. त्या दरम्यान सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 
-डॉ. ताराचंद कराळे, भाजप, आंबेगाव तालुकाध्यक्ष 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख