भाजपचा तगडा उमेदवारच राष्ट्रवादीच्या गळाला... - BJP candidate to join NCP in Pune District Bank election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

भाजपचा तगडा उमेदवारच राष्ट्रवादीच्या गळाला...

भरत पचंगे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी भाजपचा संभाव्य उमेदवारच राष्ट्रवादीने गळाला लावला आहे.

शिक्रापूर : शिरुर-हवेली मतदार संघातील भाजपचे बडे नेते प्रदीप कंद राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी संपूर्ण मतदार संघ ढवळून निघाला असतानाच आता राष्ट्रवादीकडून आणखी एक मोठी चाल खेळली जात आहे. जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी भाजपचा संभाव्य उमेदवारच राष्ट्रवादीने गळाला लावला आहे. लवकरच हा उमेदवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते.   

राष्ट्रवादीसह भाजपच्या पाठबळावर आजपर्यंत निवृत्तीअण्णा गवारेंनी जिल्हा बॅंकेची हॅट्रीक केली असली तरी यावेळी आमदार अशोक पवार हेच स्वत: जिल्हा बॅंक निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पर्यायाने भाजपाच्या अंतर्गत घडामोडींनाही वेळीच आवाक्यात आणून भाजपचा संभाव्य तगडा उमेदवारच आपल्या गळाला लावण्याचे कसब निवडणुकीपूर्वीच आमदार अशोक पवारांकडून आगामी जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी रंगत आणणारे ठरणार आहे.

जिल्हा बॅंकेच्या अ वर्ग (संस्था) गटासाठी शिरुरमधून स्वत: आमदार अशोक पवार उभे राहणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पक्षकार्यकर्त्यांमध्ये जवळपास निश्चित समजले जाते आहे. जिल्हा बॅंकेचे दिवंगत संचालक अरुणआबा गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्निलभैया गायकवाड यांच्या नावाचीही चर्चा मतदार संघात जोरदार होती. मात्र गायकवाडांच्या जवळील कार्यकर्त्यांकडूनच आता आमदार अशोक पवार उभे राहणार असल्याचे जाहीरपणे सांगितले जावू लागल्याने अशोक पवारांच्या विरोधात तगडा उमेदवार उतरविण्याची जंगी तयारी भाजपाने सुरू केली होती. 

राजकारणात अत्यंत धूर्त समजले जाणारे आमदार अशोक पवार यांना हीच कुणकुण लागताच थेट संभाव्य उमेदवारालाच गळ टाकून जाळ्यात ओढल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका प्रमुख नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. अशोक पवार यांचे राजकारणच एकदम हटके आहे. पक्षात राहून त्यांच्या विरोधात जाणा-यांचे राजकीय करिअर कसे अडचणीत येते याची उदाहरणे संपूर्ण मतदार संघ जाणतो. 

माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, दिवंगत बाळासाहेब खैरे, शिरुरचे भाजपा तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे ही मंडळी शिरुर राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची कारण म्हणजे 'अशोक पवारांशी पंगा...’ हेच सांगता येईल. 

शिरुर-हवेलीतील पक्ष संघटनेवर प्रचंड मजबुत ताकद हे वैशिष्ठ्य असलेल्या अशोक पवारांनी आता आपला मोर्चा जिल्हा बॅंकेवर वळविल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यांना कुठलाही राजकीय निर्णय घेण्यासाठी विरोध करणारे तसेही आता शिरुर राष्ट्रवादीत शिल्लक राहिलेले नाही. अर्थात राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्याच्या त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी थेट भाजपाच्या इच्छुक उमेदवारालाच गळ टाकला आणि आपल्या जाळ्यात ओढले आहे. लवकरच या बड्या प्रस्थाचा राष्ट्रवादी काँग्रेलमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. स्वत: अशोक पवार बॅंकेला नसतील तर हेच ’प्रस्थ’ बॅंकेसाठी उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडून असणार हे नक्की आहे. अर्थात ही घडामोड आंबेगाव-शिरुरचे आमदार जेष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांना सांगून केल्याचेही खात्रिलायक स्त्रोतांनी सांगितल्याने जिल्हा बॅंकेसाठी राष्ट्रवादी-भाजपा आणि कॉंग्रेस-शिवसेनेला वेळेपूरते आपलेसे करणारे ज्येष्ठ संचालक निवृत्तीअण्णा गवारे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे हे आता नव्याने सांगायला नको.

या नावाचीही चर्चा...!

जिल्हा दुध संघात अध्यक्षपद हुकलेल्या केशरताई पवार तसेच आंबेगाव-शिरुरमधून राष्ट्रवादीच्या नेत्यांना जिल्हास्तरावरील राजकारणात पूर्ण पायबंद घातला गेल्याने पवार कुटुंबीयांपैकी माजी सभापती प्रकाश पवार, उद्योगपती सदाशिवराव पवार किंवा जिल्हा दुध संघाच्या संचालिका केशरताई पवार यांचेपैकी कुणा एकाला जिल्हा बॅंकेची लॉटरी लागल्यास नवल वाटायला नको.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख