collage (8).jpg
collage (8).jpg

खेडच्या सभापतीपदी भगवान पोखरकर ; शिवसेनेची गटबाजी चव्हाट्यावर  

खेडतालुका पंचायत समितीच्यासभापतीपदी शिवसेनेचेभगवान पोखरकरयांची आज बहुमताने निवड झाली.

राजगुरूनगर : खेड तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे भगवान पोखरकर यांची आज बहुमताने निवड झाली. पोखरकर यांना १२ तर त्यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या शिवसेनेच्याच सुनीता सांडभोर यांना २ मते मिळाल्याने, पीठासीन अधिकारी संजय तेली यांनी, पोखरकर यांना विजयी घोषित केले. 

त्यामुळे सभापती शिवसेनेचा झाला तरी पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली. खेड पंचायत समितीच्या सभापती निवडीकरीता, समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात सदस्यांची सभा बोलाविण्यात आली होती. पंचायत समितीत एकूण १४ सदस्य आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे ८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, भाजपचे १ आणि काँग्रेसचे १ असे संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेनेचा सभापती होणार हे निश्चित होते. आज सकाळी ११ वाजल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांकडे, शिवसेनेच्या भगवान पोखरकर यांचा अर्ज प्रथम दाखल झाला. थोड्यावेळाने शिवसेनेच्याच सुनीता सांडभोर आणि वैशाली जाधव यांचेही अर्ज सभापती पदाकरिता दाखल झाले. त्यामुळे निवडणुकीत वेगळेच नाट्य निर्माण झाले. 

दुपारी २ वाजता सर्व सदस्य निवडणूक प्रक्रियेसाठी सभागृहात दाखल झाले. त्यानंतर वैशाली जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जाधव, सांडभोर व वैशाली गव्हाणे या सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांकडे गुप्त मतदानाची मागणी केली. मात्र, पंचायत समितीसंदर्भातील निवडणूक कायद्यात गुप्त मतदानाची तरतूद नसल्याचे सांगून त्यांची मागणी फेटाळली व आवाजी मतदान घेतले. त्यात पोखरकर यांना १२ तर सांडभोर यांना २ मते मिळाली. 

निवडी जाहीर झाल्यावर सभापतींचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदारांशी समन्वय साधून  पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम वेगाने मार्गी लावू, असे नवनिर्वाचित सभापती पोखरकर यांनी सांगितले. सर्व पक्षभेद आणि गटतट बाजूला ठेवून, विकासासाठी, सभागृहात काम करू, असेही ते म्हणाले. 

सभापती शिवसेनेचे असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ आणि काँग्रेस व भाजप या पक्षांच्या एकेका सदस्यानेही पाठिंबा दिल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजप अशी अनोखी युती याठिकाणी पाहावयास मिळाली. नेहमी नेते मैत्री जपतात आणि कार्यकर्ते भांडतात, असे चित्र पहावयास मिळते. येथे मात्र नेत्यांमध्ये संघर्ष असतानाही सर्वपक्षीय पंचायत समिती सदस्य एकत्र आल्याचे अनोखे चित्र पहावयास मिळाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com