बारामतीकरांनी एकाच दिवसात  केली तीन कोटींच्या सोन्याची खरेदी

सराफ व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल एकाच दिवसात तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने खरेदी केले.
gold
gold

बारामती : लॉकडाउननंतर शिथीलता दिल्यानंतर काल पहिल्याच दिवशी बारामतीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सराफ व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल एकाच दिवसात तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने खरेदी केले. 


लॉकडाउननंतर जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सराफ व्यावसायिकांनी दुकाने उघडल्यानंतर ग्राहकांची संख्या रोडावेल, मानसिकतेमुळे लोक सोने खरेदी करणार नाहीत असे सगळे अंदाज फोल ठरवत लोकांनी सोन्याची लयलूट केली. 

शेअर्समध्ये होणारे कमालीचे चढउतार, बाजारातील मंदीची परिस्थिती, बँकाच्या ठेवींवरील झपाट्याने घसरत चाललेले व्याजदर, बँकाबाबतही निर्माण झालेली काहीशी अविश्वासाची भावना तसेच लग्नसराईचा मोसम यामुळे सोन्याला चांगली मागणी वाढल्याचे काही सराफ व्यावसायिकांनी सांगितले. दुसरीकडे लॉकडाउनमुळे लग्नाची पध्दतच बदलून गेली, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न होऊ लागल्याने इतर सर्व खर्च कमी झाल्याने वाचलेले पैसे लोकांनी सोन्याच्या खरेदी गुंतविल्याचे चंदुकाका सराफ अँड सन्सचे किशोर शहा यांनी सांगितले. 

सोन्यामध्ये गुंतवणूक ही सध्या लोकांना बदलत्या परिस्थितीत अधिक विश्वासार्ह वाटू लागली आहे, त्यामुळे लोकांनी सोनेखरेदीवर भर दिल्याचे जोतिचंद भाईचंद सराफ पेढीचे शांतीकुमार शहा यांनी सांगितले. ग्रामीण भागात आजही तातडीने पैसे उभारणीचे साधन म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. त्या मुळे आजही कसलेही पैसे आले तरी लोक सोने खरेदीस प्राधान्य देतात.

सोने मोडून पैसे उभे करण्याकडेअधिक कल


सोन्याच्या भावात आगामी काळात भावात चांगली वाढ होईल, या अपेक्षेनेही सोने खरेदी करणा-यांची संख्या अधिक होती, असे महालक्ष्मी ज्वेलर्सचे विनोद ओसवाल यांनी सांगितले. सोन्यातून तातडीने पैसे उभे राहतात हीही एक जमेची बाजू आहे. लॉकडाऊननंतर आलेल्या नकारात्मक लाटेचा परिणाम सोन्याच्या खरेदीवर होईल व खरेदीऐवजी सोने मोडून पैसे उभे करण्याकडे लोकांचा अधिक कल असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात लोकांनी सोनेखरेदी अधिक प्रमाणात केली. अनेक अंदाज फोल ठरवत लोकांनी पारंपरिक सोन्याच्या खरेदीत रस दाखविला. शारिरीक अंतराचे बंधन, गर्दी करायची नाही हे बंधन असल्यामुळे विक्रीवर मर्यादा आल्या होत्या, अन्यथा विक्री अधिक वाढली असती, असेही अनेकांनी सांगितले. सोन्याचा भाव 46 हजारांवर जाऊनही लोकांनी भावाचा विचार न करता सोने खरेदी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com