बारामतीच्या व्यापाऱ्यांचा संयम संपला; सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय 

सोमवारनंतर व्यापारी दुकाने बंद ठेवण्याच्या मनःस्थितीत नसून सर्व व्यापारी आपापले व्यवहार पूर्ववत सुरु करणार असल्याचे आज (ता. 19 सप्टेंबर) बारामतीत व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले.
Baramati traders lost patience; Decision to open shops from Monday
Baramati traders lost patience; Decision to open shops from Monday

बारामती : बारामती शहरातील व्यापाऱ्यांनी गेली 14 दिवस कमालीचा संयम बाळगला आहे, मात्र, सोमवारपासून (ता. 21 सप्टेंबर) व्यापारी आपले व्यवहार पूर्ववत सुरु करणार असल्याची माहिती बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी व मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर यांनी दिली. दरम्यान, दुकानांची वेळही सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत ठेवण्याचे व्यापाऱ्यांनी निश्‍चित केल्याचेही त्यांनी सांगितले. 

बारामतीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यामुळे बारामतीत 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. शहराच्या आरोग्याचा विचार करुन सर्वच व्यापाऱ्यांनी 14 दिवस सलग दुकाने बंद ठेवून या निर्णयाला पाठिंबा दिला होता. 

आता मात्र सोमवारनंतर व्यापारी दुकाने बंद ठेवण्याच्या मनःस्थितीत नसून सर्व व्यापारी आपापले व्यवहार पूर्ववत सुरु करणार असल्याचे आज (ता. 19 सप्टेंबर) बारामतीत व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले. व्यापाऱ्यांची आता मानसिकता दुकाने उघडण्याची असल्याचे आजच्या बैठकीत समोर आले. आता व्यापारी दुकाने बंद ठेवण्यास तयार नाही, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न यातून निर्माण झाला आहे, असे सांगण्यात आले. 

दरम्यान, गुजराथी व वडूजकर या दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मेसेज पाठवून सोमवारपासून बारामतीची बाजारपेठ पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात प्रशासनास आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे. स्वतः गुजराथी यांनीच या बाबत माहिती दिली.

दुकानांची वेळही आता सकाळी नऊ ते संध्याकाळी सात करावी अशीही विनंती करण्यात आली आहे. पाचपर्यंत दुकाने उघडी राहिल्यामुळे जास्त गर्दी होत असून सातपर्यंत केल्यास शहरातील ग्राहक थोडे उशीरा येऊ शकतील, असा या मागचा व्यापाऱ्यांचा उद्देश आहे. 

आजच्या बैठकीला नरेंद्र गुजराथी व महावीर वडूजकर यांच्यासोबत सुशील सोमाणी, नरेंद्र मोता, अभय गादिया, नाना शेळके, शैलेश साळुंके, प्रवीण आहुजा, स्वप्नील मुथा, सुजय निंबळककर, महेंद्र ओसवाल, किरण गांधी, बाळू चांदगुडे यांच्यासह गाळेधारक संघटनेचेही प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com