आळंदी देवस्थानातील चोपदार कृष्णराव उर्फ बाबुराव रंधवे यांचे निधन  

आळंदी देवस्थानमधील मानकरी व पालखी सोहळ्यातील परंपरागत चोपदार कृष्णराव उर्फ बाबुराव वासूदेव रंधवे यांचे आज निधन झाले.
collage (61).jpg
collage (61).jpg

आळंदी : आळंदी देवस्थानमधील मानकरी व पालखी सोहळ्यातील परंपरागत चोपदार कृष्णराव उर्फ बाबुराव वासूदेव रंधवे (वय ८३) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. गेली सत्तावीस दिवस त्यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आळंदी देवस्थानचे मानकरी व बांधकाम व्यावसायिक राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार यांचे वडिल, पुणे महापालिकेतील सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांचे ते सासरे होत. पुणे महापालिकेच्या सहायक शिक्षण प्रमुख शिल्पकला रंधवे, लेखिका प्रकाशक शैलजा मोळक यांचे ते वडिल होत. 

कोरोनाची लागण झाल्याने वीस दिवसांपूर्वी बाबुराव चोपदार यांना रूग्णालयात दाखल केले होते. मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी येरवडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी केला. 
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात चोपदार म्हणून त्यांचा मान होता. पालखी सोहळ्यात बैलगाडी ते हायटेक वारीचे साक्षिदार होते. संत विचाराबरोबरच पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. वारीतील परंपरा टिकवित काळानुरूप झालेले बदल स्विकारण्यास त्यांच्या सतत पाठिंबा होता. 

सातारा जिल्ह्यातील मार्डी (शिखऱ शिंगणापूर) येथे त्याचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण आळंदीत व माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. कार्तिकी यात्रेत यात्रा कर गोळा करणारा कामगार म्हणून त्यांनी काम केले. हार फूल, वृत्तपत्रही विकले. त्यानंतर १९५८ ला शिक्षक म्हणून नोकरीस लागले. सदतीस वर्षे त्यांनी शिक्षक म्हणून सेवा केली. वाघाव (देशमुखवाडी), सोळू, मरकळ, भोसरी, पिसर्वे, गोलेगाव आणि आळंदी पालिका शाळेत त्यांनी विद्यादानाचे काम केले. अनेक वर्षे त्यांनी विविध वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम केले. ते आळंदीतील पहिले पत्रकार होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचेही त्यांनी अनेक वर्षे वार्तांकन केले. वारीचे वृ्त्तांकन करण्यासाठी येणा-या नविन पत्रकारांसाठी चोपदार गुरूजी मार्गदर्शक म्हणून मोलाचे काम केले. 

वारीत अधिकारी, राजकीय व्यक्तींना वारीची परंपरा ते समजावून सांगत. वारीत तरूणांनी अधिकाधिक सामिल व्हावे, यासाठी त्यांचा कायम आग्रह होता. वारीमध्ये पालखी सोहळ्याचे छापून आलेले वृत्तांकन वारक-यांना वाचायला मिळावे यासाठी त्यांनी हातात पेपर घेऊन वारीतील चोपदारकीच्या जबाबदारीबरोबर वृत्तपत्र विकण्यास सुरूवात केली. याशिवाय वारी आणि आळंदीबाबत छापून आलेल्या बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह करण्याचा छंदही त्यांनी आजन्म जोपासला होता. 

आळंदी देवस्थानमध्ये वर्तमानपत्र भाविकांसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी नव्वदच्या दशकात पाठपुरावा करून देवूळवाड्यात वाचनालय उपलब्ध केले होते. त्यांनी वारीमध्ये वाट चुकलेल्या महिलांना पुन्हा दिंडी पोहोच करण्यासाठी दिंड्यांच्या मुक्कामांची यादी दरवर्षी अद्ययावत ठेवली.  'सकाळ ' ने यासाठी सुरू केलेल्या 'जाऊ देवाचिया गावा' या उपक्रमासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले.

१९९१ मध्ये तत्कलीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मानकरी म्हणून  ताम्रपट देऊन विशेष सत्कारही करण्यात आला होता. आर्थिक शिस्त प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे यासाठी त्यांचा सतत आग्रह होता. याच भावनेतून त्यांनी देवस्थानमधील गरिब कर्मचा-यांना पोस्टातील अल्प बचतीची खाती सुरू करण्यास मदत केली. वारीमध्ये तसेच आळंदी देवस्थामधे माउलींच्या समाधीसमोर विविध नैमित्तिक आणि धार्मिक कार्यक्रमासाठी चोपदार म्हणून त्यांचा परंपरागत मान होता. वारी काळात दिंड्यांची यादी तयार करणे, वारीसाठीची पत्रव्यवहार करणे, मानाची कीर्तन प्रवचनाची यादी बनविणे, वारी काळात पूर्वी दिंड्यांना रॉकेल व्यवस्था, रस्त्यांची दुरूस्ती, वाहन पास योजना अशी अनेक कामे ते सातत्याने करत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com