#Ayodhya: Village bricks sent 28 years ago are meaningful today: Jayashree Palande | Sarkarnama

#Ayodhya : २८ वर्षांपूर्वी पाठविलेल्या गावोगावच्या वीटा आज सार्थकी : जयश्री पलांडे

भरत पचंगे 
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

देशभरातील तमाम हिंदूत्ववादी पक्ष, संघटना, विचारधारा यांनी एकत्रितरित्या केलेल्या आंदोलनाचे यश म्हणजेच आज राम मंदिर पायाभरणी असल्याचे पलांडे आवजून सांगतात.

शिक्रापूर (पुणे ) : राष्ट्रहित आणि हिंदूत्वाला केंद्रस्थानी ठेवून केंद्रात पहिल्यांदा सत्ता मिळविण्यासाठीचा भाजपाने राममंदिर उभारणी आंदोलनाच्या निमित्ताने ज्या काही मोजक्या नेतृत्वांची चुणुक देश-राज्याने अनुभवली. त्यात शिरुर तालुक्यातील भाजपाच्या तत्कालीन नेत्या जयश्री पलांडे यांचे स्थान अग्रभागी आहे.  

त्यांचा लढाऊ बाणा आणि त्यांनी अयोध्येत राममंदीर उभारणीसाठी गावागावातून पूजाविधीने पाठविलेल्या वीटा आजच्या अयोध्येतील राममंदिर उभारणीसाठी कामाला येणार असल्याचा सार्थ अभिमान त्या व्यक्त करीत आहेत. देशभरातील तमाम हिंदूत्ववादी पक्ष, संघटना, विचारधारा यांनी एकत्रितरित्या केलेल्या आंदोलनाचे यश म्हणजेच आज राम मंदिर पायाभरणी असल्याचे पलांडे आवजून सांगतात.

केंद्रीय राजकारणात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी आणि प्रमोद महाजन या सर्वांच्या निमित्ताने भाजपाने राममंदिर उभारणीसाठीची आंदोलनात्मक व्यूहरचना आखली त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अण्णा डांगे, प्रकाश जावडेकर, धरमचंद चोरडीया, ना. सं. फरांदे, किरीट सोमय्या, जयसिंगराव गायकवाड, गिरीष बापट, विमल मुंदडा आदींच्या बरोबरीने पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये भाजपा उभारणीत मोठे योगदान असलेल्या पलांडेंनी कारसेवेसाठी जी काही तत्कालीन कार्यकर्त्यांची टिम उभी केली.

त्यात संपतकाका दौंडकर (करंजावणे), अशोक रासकर, रवी पिंगळे (तळेगाव- ढमढेरे), शिवाजी भुजबळ, एकनाथ करपे, विमलताई म्हेत्रे (राऊतवाडी), भिषणशेठ आगरवाल (कोरेगाव-भीमा), त्रिंबक बापू जगताप, मधुकाका ढवळे, संपतराव शेलार (वडगाव-रासई), गणपतदादा फराटे, शिवाजीबापू फराटे, शामराव चकोर (मांडवगण-फराटा), संभाजी प-हाड, माऊली साकोरे, मधुकर जाधव (केंदूर-पाबळ), सुरेंद्र देव (रांजणगाव) आदींसह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.  यातील २४० कारसेवक घेवून पलांडे यांनी दिल्लीकडे कुच केली आणि क्षमता दाखवून दिली. त्याची चर्चा पुन्हा नव्याने आजच्या राममंदिर भूमिपूजन प्रसंगाने सुरू झाली आहे. 

दरम्यान राममंदिर उभारणीसाठी दिल्लीत महाराष्ट्र सदनापुढे जे भाजपाचे राष्ट्रीय आंदोलन झाले. त्यावेळी गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे, विजयाराजे शिंदे, धरमचंद चोरडीया, जयसिंगराव गायकवाड, आण्णा डांगे, किरीट सोमय्या, विमल मुंदडा, दिलीप हजारे, पांडूरंग फुंडकर आदींसोबत पलांडे यांच्यावर झालेला लाठी हल्ला तमाम भाजपा कार्यकर्ते आजही विसरलेले नाहीत. अर्थात वादग्रस्त वास्तू पाडण्याच्या वेळीचा भोसरीचे तत्कालीन नगरसेवक अमृत प-हाड यांना ढिगा-यातून जिवंत ओढून काढतानाचा प्रसंग आजही अंगावर शहारे आणणारा आहे.

या सर्वच हिंदूत्ववादी संघटना, पक्ष, विचारधारा यांचा मेळ घालून सध्या शिवसेनेत काम करणा-या पलांडे यांना राममंदिर उभारणीची पायाभरणी होणे हे स्वप्नवत वाटते.  केशवराव वाडेकर (वडगाव मावळ), तत्कालीन विधान परिषदेचे पुण्यातील आमदार अरविंद लेले, तत्कालीन जिल्हाध्यक्ष एकनाथ टिळे, पुण्यातील कांचनभाई शहा यांनी दिलेली साथ यामुळेच त्याकाळी शिरुरच्या प्रत्येक गावात फिरुन त्या-त्या गावातील पवित्र वीट थेट राममंदिर उभारणीसाठी पाठविण्याचे दौरे आज सार्थकी लागल्याचे भासतात. अर्थात राममंदिर उभारणीचे काम आजपासून तर सुरू होणार आहेच, मात्र, त्यामागे तमाम हिंदूत्ववादी संघटनांच्या खूप मोठ्या कार्यकर्त्यांच्या फळीचे मोठे योगदान आहे हे नक्की.
 

वेशांतर आणि रेल्वेतून टाकलेली उडी  
शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावातून राममंदिरासाठी वीट घेवून ती पुढे अयोध्येला पाठविण्यापूर्वी शिरुरच्या राममंदिर, न्हाव-याचे मल्लीकार्जून मंदिर, वडगाव-रासईमधील रासई मंदिर अशा सर्व प्रमुख ग्रामदैवते, कुलदैवते यांच्यापुढेही या वीटांचे पूजन झाले होते. अर्थात हे होताना दिल्लीतील राममंदिर उभारणीसाठीचे त्या काळातील आंदोलनावेळी मालवियनगर ते महाराष्ट्र सदन बाबरी मस्जिद प्रकरणानंतर पुढील सहा महिन्यांनी झालेल्या दिल्लीतील राममंदिर आंदोलनावेळी वेशांतर करुन आंदोलनात सहभाग, रेल्वेतून टाकलेली उडी आणि तब्बल १६ किलोमिटर गटार-रस्त्याने चालून आंदोलनस्थळी वेळेत पोहचण्याच्या आठवणी आज राममंदिर भुमिपुजनाच्या निमित्ताने ताज्या झाल्या असून तो काळ जसा भारावलेला होता असेही त्या आवर्जून सांगतात. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख