उसाच्या थकीत बिलासाठी छत्रपती कारखान्यावर आत्मदहनाचा प्रयत्न 

येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर 400 रुपये प्रति टनाप्रमाणे पैसे जमा न केल्यास कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाला फिरू न देण्याचा इशारा त्यांनी दिला.
Attempted self-immolation at Chhatrapati factory for exhausted sugarcane bill
Attempted self-immolation at Chhatrapati factory for exhausted sugarcane bill

वालचंदनगर (जि. पुणे) : उसाच्या थकीत "एफआरपी'साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बारामती तालुकाध्यक्ष विकास धनाजी बाबर यांनी आज (ता. 9 ऑक्‍टोबर) इंदापूर तालुक्‍यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. बाबर हे बारामती तालुक्‍यातील पिंपळीचे रहिवासी आहेत. 

छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामात सव्वाचार लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्याची एफआरपीची रक्कम 2472 रुपये होते. त्यातील पहिला हप्ता 2100 रुपयांचा रोख दिला आहे. कारखान्याकडून उसाची प्रतिटन 372 रुपये एफआरपी रक्कम देणे प्रलंबित आहे. दसरा दिवाळीचा सण जवळ येत असून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व दुसरा हप्ता मिळला नसल्यामुळे सभासदांमध्ये नाराजीचा सूर होता. 

भवानीनगर येथे छत्रपती कारखान्याच्या 65 व्या बॉयलर प्रदीपनाचा कार्यक्रम सुरू होता. तेवढ्यात अचानकपणे शेतकरी संघटनेचे विकास बाबर यांनी "आमच्या पैशाचं काही झालं चेअरमनसाहेब...आमचे पैसे द्या...पैसे...' अशी मागणी करीत अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

पुजेसाठी बसलेले छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या पत्नी व सोलापूरच्या पोलिस उपायुक्त वैशाली पाटील यांनी प्रसंगावधान राखून ओळखून तातडीने बाबर याच्या हातातील डिझेल कॅन काढून घेतले. कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने बाबर यांना बाजूला घेऊन गेले. 

थकीत एफआरपीबाबत बाबर म्हणाले की, छत्रपती कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा संचालक मंडळाच्या निष्क्रियेतेमुळे एफआरपीचे रक्कम न देता कारखान्याचा बॉयलर पेटविण्यात आलेला आहे.

येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर 400 रुपये प्रति टनाप्रमाणे पैसे जमा न केल्यास कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाला फिरू न देण्याचा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com