अशोक पवार-शिवसेना वादात आता दादा पाटील फराटेंची एंट्री  - Ashok Pawar-Shiv Sena dispute now Dada Patil Farate's entry | Politics Marathi News - Sarkarnama

अशोक पवार-शिवसेना वादात आता दादा पाटील फराटेंची एंट्री 

नितीन बारवकर 
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

त्यांनी आगामी कारखान्याच्या निवडणुकीत आमदारांच्या विरोधात उभे राहून आपली ताकद दाखवून द्यावी.

शिरूर : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा पुणे येथील साखर वाटपाचा गोड सोहळा कारखान्याचे अध्यक्ष आमदार ऍड. अशोक पवार आणि संचालक तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे काहीसा कडू झाला. पण, शिवसेनेची पाठराखण करीत भाजपने या वादात उडी घेतली आहे. 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे हे या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे आणि भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांच्यात शब्दयुद्ध रंगले आहे. दिवाळीच्या तोंडावर फटाके फुटण्याऐवजी एकमेकांविरोधात शड्डू ठोकल्याचे आवाज राजकीय पटलावर घुमू लागले आहेत. दिवाळीतील फटाकेबाजीपूर्वीच तीनही पक्ष यानिमित्ताने मैदानात उतरल्याने राजकीय आखाड्यात रंगतदार राजकीय आतषबाजी सुरू झाली आहे. कारखान्याच्या आगामी निवडणुकीतील संभाव्य संघर्षाची ठिणगी यानिमित्ताने पडल्याचे चित्र आहे. 

पुण्यातील साखर वाटपावेळी आमदार पवार व सुधीर फराटे यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर फराटे यांनी थेट पवारांनी हल्ला केल्याचा आरोप करीत सोशल मीडियावर रान पेटवले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मांडवगण फराटा गावात या हल्ल्याचा निषेध करून निषेध रॅली काढण्यात आली. 

या वेळी झालेल्या सभेस शिवसेनेचे फारसे कुणी उपस्थित नसताना, भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी मात्र अचूक टोलेबाजी करीत आगामी काही महिन्यांवर आलेल्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीतील विरोधी आवाजाचे रणशिंग फुंकले. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काळे यांनी, तालुकाप्रमुखावर हल्ला झाला म्हणून निषेध नोंदवायला शिवसैनिक नकोत का, असा सवाल उपस्थित करून ही भाजप पुरस्कृत निषेध सभा होती, असा आरोप केला. भाजपवाल्यांत एवढीच फुरफूर असेल; तर त्यांनी आगामी कारखान्याच्या निवडणुकीत आमदारांच्या विरोधात उभे राहून आपली ताकद दाखवून द्यावी, असे आव्हान त्यांनी दिले. 

काळे यांना दादा पाटील फराटे यांनी संयत उत्तर दिले. सुधीर फराटे हे आमच्या पॅनेलच्या विरोधात निवडून आलेले आहेत. मात्र, कारखान्यातील वस्तुस्थिती व गैरप्रकार ते सभासदांपुढे मांडत असल्यानेच त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्याबाबतीत झालेल्या प्रकारात निषेधासाठी एकत्र येण्याला पक्ष-पार्टीचा विषय नाही, ही आमची राजकीय संस्कृती आहे, असे ते म्हणाले. 

याचवेळी दादा पाटील यांनी आमदार पवार यांनाही टार्गेट केले. आता कारखान्यासह सगळी सत्तास्थाने आमदार पवार यांच्या ताब्यात असताना घोडगंगा तोट्यात का? हा प्रश्न उभा राहतो. गेली 25 वर्षे कारखान्याचा एकहाती कारभार ज्यांच्याकडे आहे, तेच याला जबाबदार नाहीत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख