म्हणून खासदार अमोल कोल्हेंनी मानले आढळरावांचे `आभार!`

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत असले तरी पुणे जिल्ह्यात या दोन पक्षांत फारसे सख्य नाही.
kolhe-adhalrao.jpg
kolhe-adhalrao.jpg

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थकांत सध्या वेगळ्याच कारणावरून वाद पेटला आहे. या वादात एक हमखास आरोप परस्परांवर केला जातो तो म्हणजे भाजप प्रवेशाचा. आढळराव हे लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याचा दावा कोल्हे यांचे समर्थक सोशल मिडियात करतात आणि दुसरीकडे कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याचे आढळरावांचे कार्यकर्ते सांगत असतात. 

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या चार आमदारांना वैतागून कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्त एका स्थानिक वर्तमानपत्रात आले. त्यासाठी भाजप नेत्यांसोबत कोल्हे यांची बैठकही झाली. कोल्हे  यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. भाजपने केंद्रात मंत्रीपद द्यावे आणि त्याबदल्यात आपल्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला राज्यात होईल, असे कोल्हे यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले होते.

यावर वृत्तावर कोल्हे यांनी सोशल मिडियातून प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया आढळराव यांना टॅग केली. या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले की  “१५ वर्षे मालिका क्षेत्रात काम करताना एवढा अफाट कल्पनाविस्तार आणि करमणूक पहायला मिळाली नव्हती! मन:पूर्वक आभार!`` एकूण या वृत्ताला आढळराव जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

गेले काही दिवस या दोन नेत्यांत जोरदार सोशल मिडिया वाॅर सुरू आहे. कोरोनाकाळात कोल्हे मतदारसंघात फिरकत नसल्याचा आरोप त्यांचे विरोधत करतात. या टिकेला प्रत्युत्तर म्हणून आढळराव हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्या होत्या. आता तशीच टीका कोल्हे यांच्यावर केली जात आहे. 

पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेते आणि कार्यकर्ते हे सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेसवर चिडून आहेत. राज्यात तीन पक्षांच आघाडी सरकार असले तरी पुणे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांत स्थानिक पातळीवरील वाद कमी झालेले नाहीत. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मंजूर केेेलेल्या कामाला राष्ट्रवादीचे लोक विरोध करत असल्याचा आरोप ठेवून शिवसेनेने जिल्हा परिषदेत आंदोलनही केले होते. या आंदोलनावर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आढळराव हे खासदारकी गेल्यापासून बैचेन असल्याची तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्याला शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर आले. आता थेट कोल्हे  यांनीच आढळरावांना चिमटा काढला आहे. आता आढळराव काय उत्तर देतात, हे पाहायचे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com