अमिताभ बच्चन यांनी बारामतीत घेतली पवारांची भेट... - Amitabh Bachchan meets Ajit Pawar in Baramati | Politics Marathi News - Sarkarnama

अमिताभ बच्चन यांनी बारामतीत घेतली पवारांची भेट...

मिलिंद संगई
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

अमिताभ बच्चन, अजय देवगण हे आज बारामती एअरपोर्टवर आले होते. 

बारामती :  महानायक 'बिग बी' अमिताभ बच्चन आणि 'सिंघम' अजय देवगण आज सकाळी बारामती एअरपोर्टवर उतरल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. साक्षात अमिताभ बच्चन व अजय देवगण एकत्र पाहिल्यावर अनेकांना डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.

बारामती विमानतळावर एका चित्रपटातील एका प्रसंगाचे चित्रिकरण होणार होते. या बाबतची पूर्वकल्पना काही मोजक्याच लोकांना होती. आज खाजगी विमानाने बच्चन व अजय देवगण अकराच्या सुमारास बारामती विमानतळावर उतरले. काही वेळानंतर एका हेलिकॉप्टरमध्ये बसून ते विमानतळावर उतरतात आणि उतरल्यानंतर अभिवादन करतात असा तो प्रसंग होता. कोणत्या चित्रपटातील हा प्रसंग होता, हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले होते. 

अमिताभ बच्चन व अजय देवगण यांचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार, शुभांगी पवार आदींनी केले. त्यांनी काही वेळ या दोघांशी संवादही साधला. 

हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे दोन कलाकार बारामतीत विमानतळावर शुटींगसाठी येणार आहेत, याची कल्पना कोणालाच नव्हती, त्यामुळे जे काही मोजके लोक त्या वेळेस विमानतळावर उपस्थित होते, त्यांनाच बिग बी समवेत छायाचित्र काढण्याची संधी मिळाली. अनेकांना ही बातमी समजल्यावर लोकांनी विमानतळाकडे धाव घेतली मात्र तो पर्यंत शुटींग आटोपून हे दोन्ही तारे मुंबईकडे विमानाने रवाना झाले होते. आपल्याला याची कल्पना असती तर जीवनातील एक अविस्मरणीय क्षण बच्चन यांच्यासोबत टिपता आला असता अशी रुखरुख अनेकांना लागून राहिली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख