अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी अजितदादा पोचले सकाळी सातला !  - Ajitdada arrives at 7 in the morning to inspect the damage caused by heavy rains! | Politics Marathi News - Sarkarnama

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी अजितदादा पोचले सकाळी सातला ! 

मिलिंद संगई 
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. 

बारामती : बारामती शहरासह तालुक्‍यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची आणि नुकसानीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 17 ऑक्‍टोबर) सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या. या पुरामुळे नुकसान झालेले रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याची सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या वैशिष्ट्याप्रमाणे आज सकाळी सात वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरून बाधित क्षेत्राची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भिगवण रस्त्यावरील अमरदीप हॉटेल, तांदूळवाडी भागातील वृद्धाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हा नदीवरील खंडोबा नगर येथील पूल, कऱ्हावागज - अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पाहणी केली. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पाऊस पडण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. पुढील काळात पूरस्थिती टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण करणे. नदीच्या आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण हटविणे. नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत अतिक्रमणे होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

बारामती तालुक्‍यातील कऱ्हावागज - अंजणगाव येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसेच, बारामती-फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करून या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांनी केली. शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, नगरसेवक सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख