अजित पवारांनी घेतले बांधकाम अधिकाऱ्यांना फैलावर; वर्षभरापूर्वी दिली होती रस्ता दुरुस्तीची सूचना - Ajit Pawar took on construction officials on the spread; Road repair instructions gived a year ago | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांनी घेतले बांधकाम अधिकाऱ्यांना फैलावर; वर्षभरापूर्वी दिली होती रस्ता दुरुस्तीची सूचना

प्रा. प्रशांत चवरे 
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

वर्षभरात त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. 

भिगवण (जि. पुणे) : वर्षभरापूर्वी सूचना करूनही भिगवण-बारामती रस्त्यावरील धोकादायक वळणे काढण्याची कार्यवाही न करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि अवघ्या काही दिवसांत कामाला सुरुवात झाली. 

भिगवण-बारामती रस्त्यावरील मदनवाडी (ता. इंदापूर) घाटात अपघात होऊन गतवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांचे निधन झाले होते. जाधव कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अजित पवार आले होते. त्या वेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मदनवाडी घाटातील धोकादायक वळणे काढण्याच्या सूचना केली होती. मात्र, वर्षभरात त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. काही काही दिवसांपूर्वी अजित पवार हे याच रस्त्यावरुन जात असताना मदनवाडी घाटातील वळणे जैसे थे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अजित पवार यांनी आपल्या वाहनांचा ताफा रस्त्यावरील मदनवाडीत घाटातच थांबविला. गाडीच्या बाहेर येत पाहणी करून त्यांनी तेथूनच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. 
संबंधित अधिकाऱ्यांना काम न झाल्याबद्दल त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यांची झाडाझडती घेत धोकादायक वळणे हटविण्याचे काम तातडीने करण्याचा आदेश दिला. 

त्यानंतर मात्र वेगाने चक्रे फिरली आणि अवघ्या काही दिवसांत कामाला सुरुवात झाली. सध्या भिगवण-बारामती रस्त्यावरील धोकादायक वळणे काढण्याचे काम वेगात सुरू आहे.

मदनवाडी घाटातील वळणाच्या ठिकाणचा सुमारे साडेसहाशे मीटर रस्ता रुंद करुन त्या ठिकाणची वळणे कमी करण्यात येत आहेत. वळणाच्या ठिकाणी रस्ता साडेपाच मीटरने वाढविण्यात येत आहे, तर इतर ठिकाणी रस्ता तीन मीटरने वाढविण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वळणाच्या ठिकाणी बारा मीटर तर इतर ठिकाणी दहा मीटर रस्ता होणार आहे. रस्ता रुंद झाल्यामुळे या भागातील अपघातांवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार असल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख