चंद्रकांतदादांचे नाव घेताच अजितदादा भडकले...त्या व्यक्तीबद्दल बोलायचंच नाही! - Ajit Pawar refuses to speak on Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादांचे नाव घेताच अजितदादा भडकले...त्या व्यक्तीबद्दल बोलायचंच नाही!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होतात.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप होतात. आजही अजितदादांनी त्या व्यक्तीबद्दल मला काहीच बोलायचं नाही, असं म्हणत टोला लगावला. राज्यात अनेक प्रश्न असून ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत, असे ते म्हणाले. (Ajit Pawar refuses to speak on Chandrakant Patil)

चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी पुण्यात घरोघरी जाऊन लसीकरण कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. त्यावर पत्रकार परिषदेत अजितदादांना प्रश्न विचारण्यात आला. याविषयी बोलताना पवार म्हणाले, मला त्या व्यक्तीविषयी काही बोलायचं नाही. मला हा विषय महत्वाचा वाटत नाही. राज्यात कोरोना, किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा असे अनेक प्रश्न आहेत. माझ्यासाठी हे प्रश्न महत्वाचे आहेत, असं म्हणत त्यांनी अधिक बोलायचं टाळलं. 

हेही वाचा : वारीचं ठरलं; यंदाही एसटीनेच जाणार पंढरपूरला...वारकऱ्यांची संख्या वाढवली

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्याविषयी बोलताना पाटील म्हणाले होते की, अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाहीत. पण, ते जेव्हा माझ्या पक्षाबद्दल बोलतात तेव्हा त्यांना मी उत्तर देणार. अजित पवार जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलतात, आमच्या संस्थांबाबत बोलतात तेव्हा त्यांना उत्तर देणे भाग असल्याचे पाटील म्हणाले. ते भाजप बद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलले तर मी शांत बसणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.

अजित पवार काय म्हणाले होते?

५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र बाहेर कसे आले, असे पाटील म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ''जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. आता कोरोनाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही पवार म्हणाले.  

त्यांना युपी-बिहार आठवलं असेल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकात पाटील यांनी राज्य सरकार कोरोनाचे मृत्यू लपवत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांना कदाचित यूपी बिहारचं आठवलं असेल. देशात कुठं कुठं पुलावरून मृतदेह टाकून दिले, हे सांगायला नको. महाराष्ट्रात मृतांचे आकडे लपवले जात नाहीत. हे आकडे लपवून काय मिळणार आहे, असे पवार म्हणाले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख