अजित पवारांनी दिले आगीच्या चौकशीचे आदेश : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत - Ajit Pawar orders inquiry into fire in company in Mulshi taluka | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांनी दिले आगीच्या चौकशीचे आदेश : मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 7 जून 2021

त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. 

मुंबई  : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १७  कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. (Ajit Pawar orders inquiry into fire in company in Mulshi taluka)

मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आग आटोक्यात असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. 

हेही वाचा : अजितदादांनी केली महेश लांडगेंची कोंडी : अधिसूचनेत भोसरीतील भूखंड PMRDA कडे वर्ग 

या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचले होते. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तत्काळ दुर्घटनास्थळी पोचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिले जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

कंपनीस आग लागून १७ कामगारांचा मृत्यू

दरम्यान,  उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या सॅनिटायझर तयार करणाऱ्या रासायनिक कंपनीला आज (ता. ७ जून) दुपारी अडीचच्या सुमारास आग लागून, सतरा कामगार होरपळून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. आगीचे प्रमाण मोठे असल्याने सर्व कामगारांचा अक्षरक्षः कोळसा झाला. रात्री साडेसातपर्यंत सर्व सतरा मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांत १५ महिलांचा समावेश आहे. मृत कामगारांमध्ये नऊ स्थानिकांचा समावेश असल्याने मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.  
 
मंगल मरगळे (रा. खारावडे), सीमा बोराटे (रा. बीड), संगीता गोंदे (रा. मंचर), सुमन ढेबे (रा. खारावडे), संगीता पोळेकर (रा. घोटावडे फाटा), महादेवी अंबारे (रा. सोलापूर), सारिका कुदळे (रा. पिरंगुट), सुरेखा तुपे (करमोळी), अर्चना कावळे, सचिन घोडके, सुनीता साठे, मंदा कुलाट, त्रिशला जाधव, अतुल साठे, गीता दिवाडकर, शीतल खोपकर, धनश्री शेलार अशी मृतांची नावे आहेत. 

एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस ही कंपनी सॅनिटायझर व अन्य उत्पादन घेते. आज कंपनीत एकूण ४१ कामगार उपस्थित होते. त्यापैकी २७ कामगार बंद खोलीत काम करीत होते. एका खोलीत नऊ पुरुष, तर दुसऱ्या खोलीत १६ महिला व दोन पुरुष असे एकूण अठरा कामगार काम करीत होते. महिलांच्या खोलीत दुपारी अचानक रसायनाने पेट घेतला व त्याचा स्फोट झाला. त्यानंतर ही आग सर्वत्र पसरली. महिलांच्या खोली वातानुकुलीत होती, त्यामुळे ती बंदीस्त असल्याने बचाव करायला फारशी संधी मिळाली नाही. तरीही त्यातून एक महिला व एक पुरुषाने सुटका करुन घेतली. दुसऱ्या खोलीतील पुरुष कामगार जिवाच्या आकांताने बाहेर पळाले. त्यातील दोन पुरुष होरपळले आहेत. महिलांच्या खोलीतून एक महिला व एक पुरुष वगळता अन्य कामगारांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख