अजितदादांनी स्वतः कार चालवत केली विकास कामांची पाहणी  - Ajit Pawar himself drove a car and inspected the development works in Baramati | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांनी स्वतः कार चालवत केली विकास कामांची पाहणी 

मिलिंद संगई 
रविवार, 17 जानेवारी 2021

रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. 

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (ता. 17 जानेवारी) बारामती दौऱ्यावर होते. बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. त्यांनी स्वतः कार चालवत बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली. बारामती-मोरगाव रस्त्याची पाहणी करत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. 

बारामती नगरपालिका हद्दीतील विविध विकासकामे वेगाने मार्गी लावण्याबाबत पवार यांनी रविवारी सार्वजनिक बांधकाम विभाग व बारामती नगरपालिकेस सूचना केल्या.

या वेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, मुख्याधिकारी किरणराज यादव, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपअभियंता विश्वास ओहोळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

बारामती-मोरगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची पवार यांनी पाहणी केली. टोलनाक्‍यापर्यंत तसेच नीरा डावा कालव्यावरील पूलापर्यंतच्या कामाबाबत त्यांनी सूचना केल्या. हा रस्ता मेडद हद्दीपर्यंत केला जाणार आहे. या शिवाय बारामतीतील कसब्यातील लेंडीनाला पुलाचीही नव्याने उभारणी होत असून त्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. या शिवाय भिगवण रस्त्यावरील सेवा रस्त्याच्या कामासह नीरा डावा कालवा अस्तरीकरण व संरक्षक भिंतीच्या कामाबाबतही त्यांनी सूचना केल्या. 

बारामती बस स्थानकाचेही काम लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असल्याने त्या बाबतही अजित पवारांनी सूचना केल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख