अजितदादांनी ठेकेदाराला घेतले फैलावर; पोलिसांची कामे अशी करतो...   - Ajit Pawar expressed displeasure over the work of Pune Police Headquarters | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांनी ठेकेदाराला घेतले फैलावर; पोलिसांची कामे अशी करतो...  

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

अजित पवारांच्या काम करुन घेण्याच्या शैलीची नियमीत चर्चा होते.

पुणे : पुणे पोलीस मुख्यालयातील (Pune Police Headquarters) ब्रिटिशकालीन इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले असून, या इमारतीमध्ये आता विविध विभागाची कार्यालये सुरू केली जाणार आहे. या इमारतीच्या नुतनीकरणाची पाहणी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवार (ता ११ जून) सकाळी केली. यावेळी सदोष काम करण्यात आले असल्याचे पवारांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच संबंधित ठेकेदाराला बोलवण्यास सांगितले आणि केलेल्या कामावरून त्यांची कानउघाडणी केली. (Ajit Pawar expressed displeasure over the work of Pune Police Headquarters)

हे ही वाचा : आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती; पिंजऱ्यातील नव्हे: चंद्रकांतदादांचा शिवसेनेला चिमटा

अजित पवारांच्या काम करुन घेण्याच्या शैलीची नियमीत चर्चा होते. ते सकाळपासूनच बैठका व भेटी घेण्यास सुरुवात करतात. सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन निदर्शनास आलेल्या चुका दाखवून देत संबंधितांचा समाचारही घेतात. असाच प्रसंग आज पोलीस मुख्यालयातील कामाची पाहणी करतेवेळी आला. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ट अधिकारीही उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील विविध कार्यालयात नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्या कामांची पाहणी करण्यासाठी अजित पवार हे सकाळी येणार असल्याने अगोदर म्हणजे जवळपास सहा वाजल्यापासून सर्व अधिकाऱ्यांची तयारी केली होती.

अजित पवार हे ठरलेल्या वेळेनुसार पोलीस आयुक्त कार्यालयात आले. गाडीतून उतरताच, त्यांनी समोर असलेल्या कौलारू बिनतारी कक्षाची पाहणी केली. वरच्या बाजूला गोलाकार करण्याची गरज होती का केले नाही? अशी विचारणा त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस उपायुक्त सपना गोरे यांच्याकडे केली. त्यावर दोघेही अधिकारी म्हणाले, आम्ही करून घेतो. 

हे ही वाचा :  राष्ट्रवादीच्या घड्याळातील काटा हा दहा वाजून दहा मिनिटांवरच का?

त्यानंतर कार्यालयाच्या छताकडे पाहून त्यांनी नाराजीचा सूर लावला. अरे किती अंतर ठेवले आहे येथे. या कामाचा ठेकेदार कोण आहे? बोलावा त्याला अशी विचारणा त्यांनी केली. ठेकेदार समोर येताच अरे काय काम केले... रे, अरे पोलिसांची काम अशी करतोस, असे अजित पवार यांनी सुनावले. यावेळी त्यांनी आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख