आदित्य आमदार शिरोळेंना ट्रोल म्हणाले," त्यावर शिरोळेंनी काय उत्तर दिले !'' 

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांना परत आणण्याच्या मुद्द्यावरुन भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यात ट्‌विटवॉर रंगले.
आदित्य आमदार शिरोळेंना ट्रोल म्हणाले," त्यावर शिरोळेंनी काय उत्तर दिले !'' 

पुणे : परदेशात अडकलेले महाराष्ट्रीय नागरिक परत आणण्यास परराष्ट्र मंत्रालय, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडिया यांनी तातडीने मदत करावी, असे ट्‌विट आदित्य ठाकरे यांनी केले होते.

यावर सिद्धार्थ शिरोळे यांनी ट्‌विट करीत महाविकास आघाडीत पूर्णपणे संवादाचा अभाव आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. 

त्यांनी म्हटले होते की, केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय वंदे भारत मोहिमेसाठी सक्रियपणे पावले उचलत आहेत. याचवेळी महाराष्ट्र सरकारचे काही विभाग परवानगी देण्यास विलंब लावत आहेत. इतर राज्ये त्यांच्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करीत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने केवळ एका विमानाला परवानगी दिली. 

महाराष्ट्रातील सुमारे 1 हजार नागरिक परदेशातून मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. कारण, महाराष्ट्र सरकार अतिशय संथपणे आणि धरसोड वृत्तीने धोरणे राबवत आहे, अशी टीका शिरोळे यांनी केली होती. 

याला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरे यांनी ट्‌विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही नवीन आणि तरुण असल्याने इतर ट्रोल आर्मीपेक्षा वेगळे असाल, असे वाटले होते.

कोरोना संकटाच्या काळात दोषारोप करण्यावर तुमचा भर नसेल, असे वाटते. आम्ही कायम परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या संपर्कात आहोत. राजकारण कारण करण्याची ही वेळ नाही. 

केंद्र सरकारच्या मंत्रालयांशी आम्ही समन्वय साधत आहोत. एकमेकांकडे बोटे दाखवून काही साधणार नाही. याऐवजी केंद्र सरकारकडून नियोजन होत असलेल्या विमान उड्डाणांकडे लक्ष देऊन तिकिटांसह इतर समस्यांबाबत मदत करण्यासाठी पुढाकार घ्या. 

यावर सिद्धार्थ शिरोळे यांनी पुन्हा उत्तर दिले. त्यांनी म्हटले आहे, की मी काही ट्रोलर नाही. मी लोकनियुक्त प्रतिनिधी आहे आणि मला सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. चुकीच्या पावलांबद्दल आणि संवाद नसल्याबद्दल मी सरकारला जबाबदार धरतो. 

दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपने राज्यातील आघाडी सरकारला लक्ष्य केले असून राज्यपालांची भेट घेऊन कोरोनाच्या संकटात हे सरकार कसे अपयशी ठरले आहे याचे निवेदन दिले आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com