राष्ट्रवादीच्या ताब्यातील झेडपीवर आढळरावांचा हल्लाबोल : मोहितेंमुळेच खेड पंचायत समितीचे काम रखडले  - Adhalrao's Attack on NCP-held ZP : Khed Panchayat Samiti's work stalled due to dilip mohite | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या ताब्यातील झेडपीवर आढळरावांचा हल्लाबोल : मोहितेंमुळेच खेड पंचायत समितीचे काम रखडले 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

पुणे जिल्हा परिषद ही राजकारणाचा अड्डा बनला आहे.

पुणे : राज्य सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खेड पंचायत समितीच्या इमारतीवरून पुणे जिल्ह्यात कलह निर्माण झाला आहे. खेड पंचायत समितीच्या नवीन मुख्यालयाचे काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 18 सप्टेंबर) शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्यालयासमोर नंदीबैल आणून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. 

या वेळी शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेवर हल्लाबोल केला आहे. "पुणे जिल्हा परिषद ही राजकारणाचा अड्डा बनला आहे,' अशी टीका केली. 

खेड पंचायत समितीच्या नवीन मुख्यालयाची मंजुरी शिवसेनेचे तत्कालीन खासदार आणि आमदार या दोघांनी प्रयत्न करून आणली आहे. त्यामुळेच खेडचे विद्यमान लोकप्रतिनिधी (आमदार दिलीप मोहिते यांचे नाव न घेता) या इमारतीचे बांधकाम सुरू होऊ देत नसल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. 

सांग सांग भोलानाथ, खेड पंचायत समितीचे काम केव्हा सुरु होणार, असे नंदीबैलाला विचारत आणि आयुष प्रसाद जबाब दो, जबाब दो, अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी निवेदन स्वीकारत, याबाबत आपली भूमिका वरिष्ठांना कळवू, असे आश्वासन दिले. शेंडगे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

आढळराव म्हणाले, "या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. बांधकाम सुरू करण्याच्या कामाचा (वर्क ऑर्डर) आदेश सहा महिन्यांपूर्वीच देण्यात आलेला आहे. कामाचे भूमिपूजनही झाले आहे. या प्रत्यक्षात काम सुरू होत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे तिकडे आणि इकडे म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते असे दोन्हीकडे नुसते गोड गोड बोलत आहेत.

दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांना भेटलो. तेव्हा हे काम स्थानिक लोकप्रतिनिधीमुळे रखडल्याचे लक्षात आले आहे. मात्र, यावर मार्ग काढण्याचे आश्वासन पालकमंत्री पवार यांनी दिले होते. त्यात पुढे काही झालेच नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.' 

आढळराव पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर, जिल्हा प्रमुख माऊली कटके यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, शलाका कोंडे, तनुजा घनवट, शैलजा खंडागळे आदींसह खेड तालुक्‍यातील शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख