Adhalrao-Kolhe supporters clashed again over the caricature | Sarkarnama

व्यंग्यचित्रावरून आढळराव-कोल्हे समर्थक पुन्हा भिडले

नितीन बारवकर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

राज्याच्या राजकारणात एकत्र नांदत असताना, शिरूर मतदार संघात मात्र तुझं माझं पटेना अशीच अवस्था राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची आहे.

शिरूर (जि. पुणे) : राज्याच्या राजकारणात, महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना एकत्र आल्याच्या घटनेला वर्ष होत आले असले़; तरी शिरूर मतदार संघात मात्र उभयतांत धुसफूस सुरूच आहे. डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव या येथील आजी-माजी खासदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये ऐन कोरोनाकाळात ‘सोशल वॉर’ सुरू आहे. 

वैविध्यपूर्ण चित्र, कार्टून्स आणि खटकेबाज शब्दप्रयोगांनी आणि उडत्या चालीच्या गाण्यांनी खरंतर शिरूर लोकसभेची निवडणूक गाजली होती. ‘थापाड्या - सोंगाड्या’ अशा उपरोधिक विशेषणांनी आणि शेलक्या शब्दांनी प्रतिस्पर्ध्यांला नामोहरम करण्याचा त्यावेळी सुरू झालेला यज्ञ अद्यापपर्यंत धगधगत ठेवण्याचे महत् कार्य प्रयत्न दोन्ही बाजूंचे नेटकरी इमानेइतबारे पार पाडत आहेत. 

तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव या बलवान पहिलवानाला चितपट करताना डॉ. अमोल कोल्हे या नव्या दमाच्या मल्लाला सर्व ताकद पणाला लावावी लागली होती. पण, राष्ट्रवादीने येथील निवडणूक प्रतिष्ठेची करून डॉ. कोल्हे यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शिवसेना संतप्त झाली होती. हा पराभव जिव्हारी लागलेल्या शिवसैनिकांनी तेव्हापासूनच खासदार डॉ. कोल्हे यांना ‘टार्गेट’ करायला सुरुवात केली होती.

मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काहीशा थंडावल्या होत्या. एकमेकांविरोधातील धार काहीशी बोथट झाली होती. परंतु आता वर्षभरात पुलाखालून बरेच पाणी गेल्यानंतर शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 

शिवसेनेने नुकतेच खासदार कोल्हे यांच्या अकार्यक्षमतेचा डंका पिटत वादाला तोंड फोडले. शिरूर मतदार संघ व परिसरात कोरोनाचा कहर वाढता असताना, खासदार कुठे गायब आहेत, असा सवाल शिवसेनेने केला आहे. त्यासाठी एका व्यंग्यचित्राची मदत घेतली आहे. हे कार्टून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले आहेत.

या चित्रात खासदार पीएला विचारतात आपली शुटींगची पुढची तारीख कधी? त्यावर पीए म्हणतो, पण साहेब आपल्या मतदारसंघात कोरोना रूग्णांची संख्या खूपच वाढत चाललीय. त्यावर खासदार म्हणतात.‘अरे येडा की खुळा. तुला राजकारण कळतं का? दोन-चार पत्रं खरडायची, त्याची बातमी होते. फेसबुक लाईव्ह करून मेसेज टाकले की झालं. अजून काय करायचं लोकांसाठी? जा रायटरला पाठव, डायलॉग पाठ करायचेत. इथं मालिका खोळंबल्यात’. 

शिवसेनेचे हे कार्टून राष्ट्रवादीला चांगलेच झोंबले आहे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. इथल्या खासदारांना जे १५ वर्षात जमले नाही, ते डॉ. कोल्हे यांनी १५ महिन्यांत करून दाखवले आहे. मतदार संघातील प्रश्न अभ्यासूपणे संसदेत मांडून सोडविल्यामुळेच त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविले आहे.

अशा स्थितीत पराभवाने पछाडलेल्या विरोधकांनी त्यांच्या बदनामीची मोहिम हाती घेतली आहे. त्यांची बदनामी केली अथवा त्यांच्या नेतृत्वावर ओरखडे ओढण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिला आहे. या आशयाचे पोस्टर बॅनर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्हायरल करून शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. 

राज्याच्या राजकारणात एकत्र नांदत असताना, शिरूर मतदार संघात मात्र तुझं माझं पटेना अशीच अवस्था राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची आहे. त्यातून या दोन्ही पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांत वारंवार खटके उडत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी कुठल्याही थराला कार्यकर्ते जाताना दिसतात. शिरूर मतदार संघाच्या वर्चस्वावरून या दोन्ही पक्षात विस्तव जात नसताना, अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणात मात्र, दोघांत कमालीचे मतैक्य दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाधक ठरत असलेल्या कंगनावर डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव या आजी-माजी खासदारांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याने व्यंग्यचित्र शेअर केल्याने त्याला शिवसैनिकांच्या टोकाच्या रोषाला सामोरे जावे लागले. तशाच व्यंग्यचित्राची इथे पुनरावृत्ती झाल्याने कुणाचा डोळा सुजणार, याकडे सामान्य जनता डोळा लावून बसली आहे. भविष्यात हा वाद आणखी वाढत जाण्याची शक्यता राजकीय पटलावर वर्तवली जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख