मी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी आढळरावांची इच्छाच नव्हती : आशा बुचकेंनी डागली तोफ

त्या ठिकाणी मला अपमानास्पद वागणूक मिळाली.
Adhalrao did not want me to join Shiv Sena : Asha Buchke
Adhalrao did not want me to join Shiv Sena : Asha Buchke

नारायणगाव (जि. पुणे) : माझ्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान करावा, या माफक अपेक्षेने झाले गेले विसरून मी पुन्हा शिवसेनेत सक्रिय होणार होते. त्याबाबत लांडेवाडी येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत चार मिटिंगही झाल्या. मात्र, मुळात मी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी माजी खासदार आढळराव यांची इच्छा नव्हती. त्या ठिकाणी मला अपमानास्पद वागणूक मिळाली, असा गौप्यस्फोट जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी नारायणगाव येथील मेळाव्यात केला. (Adhalrao did not want me to join Shiv Sena : Asha Buchke)

जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केले. यामुळे जुन्नर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद वाढणार आहे. काही शिवसेना कार्यकर्ते, सरपंच व पदाधिकारी यांनी बुचके यांना पाठींबा जाहीर केल्याने आगामी निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसणार आहे.

बुचके म्हणाल्या की, माझ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावा, या माफक अपेक्षेने झाले गेले विसरून मी पुन्हा शिवसेनेत सक्रिय होणार होते. या बाबत लांडेवाडी येथे माजी खासदार आढळराव यांच्यासोबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटे, प्रसन्ना डोके, संतोष खैरे, दिलीप गांजाळे यांच्या उपस्थितीत चार वेळा बैठका झाल्या. मात्र, त्या ठिकाणी मला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने शेवटी मी १५ ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भक्कम साथ देण्याचे जाहीर केल्याने मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 

या वेळी बुचके यांनी माजी खासदार माजी आढळराव पाटील, माजी आमदार सोनवणे यांच्यावर सडकून टीका केली. एकूणच बुचके यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाचा फटका आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जुन्नर बाजार समिती व नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला बसणार आहे. या पुढे माजी खासदार माजी आढळराव पाटील, माजी आमदार सोनवणे काय भूमिका घेतात, याकडे तालुक्यातील शिवसेनेचे लक्ष लागले आहे.

आशा बुचके या पूर्वाश्रमीच्या मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या आग्रहास्तव वीस वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून जुन्नर तालुक्यातील येणेरे गटातून प्रथम जिल्हा परिषद निवडणूक लढवून विजयी झाल्या. सलग चार वेळा त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या. या माध्यमातून त्यांनी तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी तयार केली. 

माजी आमदार दांगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर २००२ ते २०१९ पर्यंत तालुक्याची शिवसेनेची सूत्रे त्यांच्या ताब्यात होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची खंबीर साथ त्यांना मिळाली. या कालावधीत त्यांनी जुन्नर पंचायत समिती, जुन्नर नगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला. विघ्नहर कारखाना, जुन्नर बाजार समिती या सहकार संस्थांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची संचालकपदी वर्णी लावली. या मुळे तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये शिवसेनेचे पदार्पण झाले. शिवसेनेच्या उमेदवार म्हणून २००९ व सन २०१४ ची विधानसभा निवडणुक त्यांनी  लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र पराभवामुळे खचून न जाता त्या तालुक्याच्या राजकारण व समाजकारणात सक्रिय राहिल्या. 

एक काळ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या त्या खंद्या समर्थक होत्या. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची २०१९ ची विधानसभेची उमेदवारी सोनवणे यांना मिळाली. त्यामुळे नाराज बुचके यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेतून त्यांची हाकालपट्टी करण्यात आली. आपल्या हाकालपट्टीला माजी खासदार आढळराव पाटील व माजी आमदार सोनवणे यांना त्यांनी जबाबदार धरले. या दोघांवर त्यांनी जाहीर टीका केली.

हाकालपट्टीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटे,  बाजार समितीच्या संचालक सुरेखा गांजळे, पंचायत समिती सदस्या दिलीप गांजळे, अर्चना माळवदकर, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, सरपंच योगेश पाटे, राजेंद्र मेहेर हे प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते बुचके यांच्याशी एकनिष्ठ राहिले. याचा फटका २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला बसून सोनवणे पराभूत झाले. याची जाणीव झाल्याने नुकत्याच झालेल्या शिवसंपर्क अभियानानिमित्त झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसला गाडण्यासाठी बुचके यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे आवाहन माजी आमदार सोनवणे यांनी केले. यामुळे बुचके या पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार, असे वातावरण तयार झाले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com