फडणवीसांनी दिलेल्या 36 कोटींचा हिशेब द्या : राष्ट्रवादीचा कुलांवर हल्लाबोल 

मनमनी कारभार करत आमदार राहुल कुल यांनी भीमा-पाटस साखर कारखान्याचे वाटोळे केले आहे.
Account for Rs 36 crore given by Fadnavis: NCP's attack on Rahul Kool
Account for Rs 36 crore given by Fadnavis: NCP's attack on Rahul Kool

केडगाव (जि. पुणे) : "हम करोसो कायदा, मनमनी कारभार करत आमदार राहुल कुल यांनी भीमा-पाटस साखर कारखान्याचे वाटोळे केले आहे. याचबरोबर तालुक्‍यातील सहकारी संस्थांची त्यांनी धूळदाण उडविली आहे' असा आरोप माजी आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केला. 

दरम्यान,"माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी 36 कोटी भीमा-पाटस कारखान्याला दिले होते, त्याचा हिशेब कुल यांनी द्यावा,' असे आव्हान राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी कुल यांना दिले. 

"तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाला पाहिजे म्हणून आम्ही हा मोर्चा काढला आहे. आम्हाला राजकारण करायची सवय नाही. त्यांना राजकारण, सत्तेचा दुरुपयोग करण्याची सवय आहे,' असा आरोपही थोरात यांनी या वेळी केला. 

दौंड तालुक्‍यातील भीमा-पाटस साखर कारखाना सुरू करावा आणि कामगारांची थकीत देणी देण्यात यावी, यासाठी थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज (ता. 11 ऑक्‍टोबर) पाटसला कारखानास्थळी आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

"या वर्षी तालुक्‍यात अतिरिक्त ऊस मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे गांभीर्य कुल यांना दिसत नाही. कारखान्याच्या कामगारांचे पगार 40 महिन्यांपासून थकले आहेत. बॅंका व विमा कंपन्यांची आमदारांनी फसवणूक केली आहे.

आमच्या ताब्यातील संस्था आम्ही प्रामाणिकपणे चालवत आहे. पुणे जिल्हा बॅंकेला मी देशात प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. मात्र, कुल यांच्या गावातील राहू विकास सोसायटीला पाच कोटींचा तोटा आहे. सोसायटीकडून होणारे कर्जवाटप बंद झाले आहे. दूध संघाची तीच अवस्था. कॉलेज काढले आणि दोन वर्षांत बंद करून विकून टाकले, असा शब्दांत थोरात यांनी कुलांवर टीका केली. 

"काही ठराविक गुऱ्हाळ चालक शेतकऱ्याला गंडा घालून पळून जातात. अशा गुऱ्हाळ चालकांना तंबी देण्याची गरज आहे,' असेही थोरात यांनी या वेळी सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार म्हणाले की, यंदा दौंड तालुक्‍यात 35 लाख टन ऊस आहे. गाळप कसे होणार यांची चिंता आहे. कामगारांची वाईट अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या चुलीचा प्रश्न असल्याने आम्ही यात कोणतेही राजकारण करणार नाही. अतिरिक्त उसामुळे गुऱ्हाळांची आवश्‍यकता आहे. गुऱ्हाळमालकांनी ती पूर्ण क्षमतेने चालवावीत. पण, प्रदूषण करू नये. 

कामगार संघाचे माजी अध्यक्ष हनुमंत वाबळे यांनी कामगारांचे प्रश्न मांडले. या वेळी पाराजी हंडाळ, केशव दिवेकर यांची भाषणे झाली. दौंड पंचायत समितीच्या सभापती आशा शितोळे, सारिका पानसरे, राणी शेळके, सत्वशील शितोळे, गणेश थोरात, रामभाऊ टुले, उत्तम आटोळे, नानासाहेब फडके, सोहेल खान या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com