90 दिवसात पुण्यात बदल झालेला दिसेल : बिडकर यांचा निर्धार

गेल्या चार वर्षात शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे अनेक नवे प्रकल्प भारतीय जनता पार्टीने पुणे महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून मार्गी लावले आहेत.
Ganesh Bidkar jpg
Ganesh Bidkar jpg

पुणे : आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या चाळीस वर्षांच्या काळात पुणे शहराची विकासाची कामे मार्गी लावण्याची इच्छाशक्ती नव्हती. गेल्या चार वर्षात शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे अनेक नवे प्रकल्प भारतीय जनता पार्टीने पुणे महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून मार्गी लावले आहेत. येत्या 90 दिवसात पुण्यातले अनेक महत्वाचे प्रश्‍न मार्गी लागल्याचे पुणेकरांना पाहावयास मिळेल, असा निर्धार महपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आज केला.

भाजपाच्या सत्ता काळाच्या चार वर्षात विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे. या विकासकामांच्या जोरावर पुढील महापलिका निवडणुक आम्ही निश्‍चितपणे जिंकू, असा विश्‍वास बिडकर यांनी व्यक्त केला. बिडकर यांची सभागृह नेते म्हणून नुकतीच निवड झाली. या निमित्ताने "सरकारनामा'शी विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी पुढील वर्षभरातील विकासाची दिशा स्पष्ट केली. 

ते म्हणाले, "गेल्या चार वर्षात पायाभूत विकासाची मोठी कामे उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चोवीस तास पाणी पुरवठ्याची योजना, पीएमपीएमएलच्या नव्या सीएनजी तसेच बॅटरीवरील बस खरेदी, रिंगरोडची योजना तसेच मेट्रोची सुरवात आणि नदी सुधारणेचा प्रकल्प या प्रमुख योजनांवर गेल्या चार वर्षात मूलभूत काम करण्यात आले. या कामात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारने तसेच केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. 

विद्यमान राज्य सरकारचीदेखील मदत आणि सहकार्य मिळत आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात यातील बहुतांश कामे दृष्य स्वरूपात दिसू लागतील. महापालिकेचा विस्तार वाढला आहे. नवी गावे समाविष्ट झाली आहेत. या गावांमध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी 10 हजार कोटी रूपयांची गरज आहे. इतके मोठे खर्चाचे काम करण्याची महापालिकेची ताकद नाही. त्यामुळे या कामात आम्हाला राज्य सरकारने मदत करण्याची गरज आहे.''

पुण्याच्या विकास कामांसाठी पुढील वर्ष महत्वपूर्ण आहे. या काळात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व खासदार गिरीश बापट यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्वूपर्ण आहे. खासदार बापट यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला या कामात होत असून संघटना म्हणून आम्ही सर्वजण बरोबरीने काम करीत आहोत, असे बिडकर यांनी सांगितले. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील राजकीय समीकरणाबाबत चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. 

या गावांमधील महत्वाच्या ग्रांमपंचायती भाजपाच्या ताब्यात आहेत हे या निमित्ताने लक्षात घ्याला हवे. चारपैकी तीन जिल्हा परिषदेत सदस्यदेखील भाजपाचे आहेत. त्यामुळे या गावांच्या समावेशाची भीती भाजपाला अजिबात नाही. उलट या गावांमध्ये भाजपाची ताकद निश्‍चितपणे अधिक आहे. त्यामुळे या गावांच्या समावेशामुळे सत्तेत येण्याची स्वप्ने कुणीही पाहून नयेत. महापालिकेत सत्तेत येण्याबाबत कोणतीही शंका आमच्या मनात नाही. येत्या काळात पुण्याचे महत्वाचे प्रश्‍न त्वरेने मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या काळात विकासाची कामे दृष्य स्वरूपात दिसतील, असे बिडकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com