सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपनीस आग लागून १७ कामगारांचा मृत्यू

मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
17 workers die in fire at chemical company in Mulshi taluka
17 workers die in fire at chemical company in Mulshi taluka

पिरंगुट (जि. पुणे) : मुळशी तालुक्यातील पिरंगुट औद्योगिक परिसरातील उरवडे येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या सॅनिटायझर तयार करणाऱ्या रासायनिक कंपनीला आज (ता. ७ जून) दुपारी अडीचच्या सुमारास आग लागून, सतरा कामगार होरपळून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. आगीचे प्रमाण मोठे असल्याने सर्व कामगारांचा अक्षरक्षः कोळसा झाला. रात्री साडेसातपर्यंत सर्व सतरा मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांत १५ महिलांचा समावेश आहे. मृत कामगारांमध्ये नऊ स्थानिकांचा समावेश असल्याने मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. (17 workers die in fire at chemical company in Mulshi taluka)
 
मंगल मरगळे (रा. खारावडे), सीमा बोराटे (रा. बीड), संगीता गोंदे (रा. मंचर), सुमन ढेबे (रा. खारावडे), संगीता पोळेकर (रा. घोटावडे फाटा), महादेवी अंबारे (रा. सोलापूर), सारिका कुदळे (रा. पिरंगुट), सुरेखा तुपे (करमोळी), अर्चना कावळे, सचिन घोडके, सुनीता साठे, मंदा कुलाट, त्रिशला जाधव, अतुल साठे, गीता दिवाडकर, शीतल खोपकर, धनश्री शेलार अशी मृतांची नावे आहेत. 

एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस ही कंपनी सॅनिटायझर व अन्य उत्पादन घेते. आज कंपनीत एकूण ४१ कामगार उपस्थित होते. त्यापैकी २७ कामगार बंद खोलीत काम करीत होते. एका खोलीत नऊ पुरुष, तर दुसऱ्या खोलीत १६ महिला व दोन पुरुष असे एकूण अठरा कामगार काम करीत होते. महिलांच्या खोलीत दुपारी अचानक रसायनाने पेट घेतला व त्याचा स्फोट झाला. त्यानंतर ही आग सर्वत्र पसरली. महिलांच्या खोली वातानुकुलीत होती, त्यामुळे ती बंदीस्त असल्याने बचाव करायला फारशी संधी मिळाली नाही. तरीही त्यातून एक महिला व एक पुरुषाने सुटका करुन घेतली. दुसऱ्या खोलीतील पुरुष कामगार जिवाच्या आकांताने बाहेर पळाले. त्यातील दोन पुरुष होरपळले आहेत. महिलांच्या खोलीतून एक महिला व एक पुरुष वगळता अन्य कामगारांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला. 

आगीचे प्रमाण एवढे होते की, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या येऊनही शिकस्तीचे प्रयत्न करूनही सुमारे पाच तास आग आटोक्यात आणण्याचे काम चालू होते. रात्री उशिरा आठपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू होते. रात्री साडेसातपर्यंत सर्व सतरा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील सोपस्कारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत. 

दरम्यान, घटनास्थळी जिल्हाधिकारी डॅा.राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, प्रांताधिकारी संदेश शिर्के, हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील, तहसीलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व मदत कार्यासाठी मार्गदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com