#MarathaReservation ;  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन... -  MarathaReservation  Movement in front of NCP office | Politics Marathi News - Sarkarnama

 #MarathaReservation ;  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

मराठा क्रांती मोर्चोतर्फे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर मराठा समाजाच्या  कार्यकर्त्यांनी आक्रोश आंदोलन केले.

पुणे : मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चोतर्फे पुण्यात टिळक रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर मराठा समाजाच्या महिला, पुरुष कार्यकर्त्यांनी आक्रोश आंदोलन केले. आमदार चेतन तुपे, बाळासाहेब अमराळे, अंकुश काकडे आदीं सहभागी होते. "एक मराठा लाख मराठा" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सारथी संस्था, आंदोलनाची पुढील दिशा याबाबत यावेळी मान्यवरांनी माहिती दिली. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्ला चढविला आहे. 'मराठा आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सदोष याचिका दाखल केली आहे. हे सरकार मराठासमाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे,' असा गंभीर आरोप मेटे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाबाबत पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मेटे म्हणाले की राज्य सरकारने 28 जुलै 2020 च्या परिपत्रकातून मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून वगळण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव सुरू केली आहे.
 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, 'सारथी' संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेसाठी निधी मंजूर केला. मात्र, मराठा समाजातील तरुणांची संख्या पाहता या योजनांमधील निधी पुरेसा नाही. तसेच या निधीचा वापर कसा करणार याबाबत सरकारकडून स्पष्टता नाही.

मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे व संघटीत लढा देण्यासाठी येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याला चांगली व ठोस दिशा मिळेल. राजघराणे मराठा समाजासोबत कायमच आहे. पुण्याच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्यापध्दतीने आम्ही काम करू, असा विश्वास साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष व शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज सकाळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या सुरूची या निवासस्थानी भेट घेतली. तसेच मराठा समाजाचे विचारमंथन बैठक पुणे येथे तीन ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीचे निमंत्रणही त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले. तसेच याविषयावर चर्चा ही केली.

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख