भरणेंविरोधात काम केलेल्या त्या नेत्यांबाबत अजित पवार काय बोलणार?  - What will Ajit Pawar, who is visiting Indapur, say about the leaders who have worked against bharane? | Politics Marathi News - Sarkarnama

भरणेंविरोधात काम केलेल्या त्या नेत्यांबाबत अजित पवार काय बोलणार? 

विनायक चांदगुडे 
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

आता पाटील भाजपमध्ये असल्यामुळे पवार पाटील यांच्याविषयी काय बोलतात, याकडेही तालुक्‍यातील जनतेचे कान असणार आहेत. 

शेटफळगढे (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीनंतर आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे येत्या सहा फेब्रुवारी रोजी इंदापूर तालुक्‍याच्या दौऱ्यावर प्रथमच येत आहेत. यावेळी होणाऱ्या मार्गदर्शन मेळाव्यात आगामी जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच कर्मयोगी साखर कारखाना याविषयी कार्यकर्त्यांना काय संदेश देणार हे पाहावे लागेल. तसेच राजकीय विरोधक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी काय बोलतात? याकडे तालुक्‍यासह जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

पवार इंदापूर तालुक्‍यात आल्यानंतर पाटील यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांचा दौरा झाल्यासारखा कार्यकर्त्यांनाही वाटत नाही. मागील वीस वर्षांत पाटील व पवार एकच मंत्रिमंडळात काम करीत होते. त्यामुळे पवार फारशी टीका करीत नव्हते. मात्र, आता पाटील भाजपमध्ये असल्यामुळे पवार पाटील यांच्याविषयी काय बोलतात, याकडेही तालुक्‍यातील जनतेचे कान असणार आहेत. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या इंदापूर येथील विभागीय कार्यालयाच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने पवार इंदापुरात येत आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेची आगामी निवडणूक आणि उमेदवारीविषयी काय बोलतात, याकडेही राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडून हर्षवर्धन पाटील गटाला जाऊन मिळालेले अप्पासाहेब जगदाळे यांच्या विरोधात विकास सोसायट्यांच्या "अ' वर्ग प्रवर्गातून कोणाला उमेदवारी देतात? याची कार्यकर्त्यांसह तालुक्‍यात उत्सुकता आहे. जिल्हा बॅंकेच्या हिताच्या दृष्टीने जागा बिनविरोध करतात? हेही पाहावे लागेल. 

तालुक्‍यात महत्त्वाची संस्था असलेली आणि कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेल्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांना काय संदेश देतात, याबाबत तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अडचणीत असताना 2019 मधील विधानसभर निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या विरोधात काम केलेल्या तालुक्‍यातील पक्ष सोडून गेलेले आणि पक्षात असूनही अंतर ठेवून असलेल्या मोठ्या नेत्यांविषयी पवार काय भूमिका घेतात? याकडेही कार्यकर्त्यांबरोबरच तालुक्‍यातील जनता लक्ष ठेवून आहे. 

इंदापूर पंचायत समिती व नगरपालिका हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहे, त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार पक्ष बांधणीच्या दृष्टीने काय सूचना करतात, हेही पाहावे लाणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख