उद्योगमंत्री पवारांच्या 90 किलोच्या वजनानं 60 किलोचे उद्योजक विव्हळतात तेव्हा... - vitthal Maniyar mischievous remark about sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

उद्योगमंत्री पवारांच्या 90 किलोच्या वजनानं 60 किलोचे उद्योजक विव्हळतात तेव्हा...

उमेश घोंगडे 
शनिवार, 12 डिसेंबर 2020

पवार यांनी मणियार यांच्या अंगावर उभे राहून अंग चेपून देण्यास सुरवात केली.

पुणे : गोष्ट त्रेचाळीस वर्षांपूर्वीची. तेव्हा शरद पवार राज्यात उद्योगमंत्री होते. पवार यांनी जवळच्या सर्व मित्रांना मुंबईत मुक्कामाला बोलावले. रात्रभर जेवण आणि गप्पा झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले. नेहमीच्या सवयीने पवार यांनी सकाळी लवकर कामाला सुरवात केली. मात्र, त्यांचे मित्र असलेले विठ्ठलशेठ मणियार अंग दुखण्याचे कारण सांगत झोपेतून उठण्यास नकार दिला.

त्यांची तक्रार घेऊन श्रीनिवास पाटील बंगल्याच्या कार्यालयात काम करीत असलेल्या पवार यांच्याकडे गेले. पवार तातडीने परत आले. अंग दुखत असलेल्या मणियार यांना उठविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, मणियार उठत नसल्याचे पाहून पवार यांनी त्यांच्या अंगावर उभे राहून अंग चेपून देण्यास सुरवात केली. पवार यांच्या 90 किलोच्या ओझ्याने 60 किलो वजन असलेले मणियार अक्षरश: विव्हळत उठले. उद्योगमंत्री या नात्याने उद्योजकाची सेवा करीत असल्याची मिश्‍किल टिपणी पवार यांनी केल्याची आठवण मणियार यांनी सांगितली.

पवार यांचे महाविद्यालयीन मित्र विठ्ठलशेठ मणियार यांनी हा किस्सा शुक्रवारी सांगितला. पुण्यात बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) पवार शिकत होते. मात्र, पुण्यात विविध महाविद्यालयात शिकणाऱ्या मित्रांचा त्यांचा मोठा गोतावळा होता. पुढे राजकारण, प्रशासन, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचे मित्र काम करू लागले.

यापैकी धनाजी जाधव एक होते. याशिवाय बालकुमार अगरवाल नावाने त्यावेळी कुलाब्याचे (आताचा रायगड जिल्हा) जिल्हाधिकारी होते. साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे त्यावेळी पिंपरी-चिंचवडला आयुक्त म्हणून काम करीत होते. उद्योजक ईश्‍वरदास चोरडिया, कर्नल संभाजी पाटील यांचा यात प्रामुख्याने समावेश होता. 

आज (ता.12) पवार यांचा वाढदिवस आहे. वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करून ते ऐक्‍यांशीव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. महाविद्यालयीन काळातील त्यांचे सर्व मित्र आजही नियमितपणे भेटतात. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मणियार यांनी मुंबईतला हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, "उद्योगमंत्री असलेले पवार एकेदिवशी पुणे दौऱ्यावर आले. दिवसभराची त्यांची कामे आटोपून त्यांनी पुण्यात मुक्काम केला. "प्रोटोकॉल'ची मोटार सोडली. कर्मचाऱ्यांना मुंबईत परत जाण्यास सांगितले. पुण्यातल्या विश्रामगृहात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी चोरडिया व जिल्हाधिकारी अगरवाल यांच्या खासगी मोटारीने आम्ही सर्वजण मुंबईला निघालो. चोरडिया अन्य मित्रांना घेऊन पुढे निघाले. पुण्यातल्या विश्रामगृहातून पवार यांना घेऊन आम्ही निघालो. 

अगरवाल मोठे शिस्तीचे मोटार चालविणारे असल्याने पुण्यातून निगडीत जाण्यासाठी आम्हाला एक तास लागला. तिथून श्रीनिवास पाटील यांना घेतले. मात्र, निघताना पवारांनी अगरवाल यांना बाजूला बसायला सांगून स्वत:च मोटारीचा ताबा घेतला. पवारांनी मोटार अशी काही चालविली की लोणावळा येईपर्यंत आधीच डबघाईला आलेली ती मोटारी लोणावळ्यात बंद पडली. त्यावेळी लोणावळ्यात हिंदुस्तान मोटार्सचे वितरक होते बाबूजी पसारी. पवार यांनी त्यांच्याकडून दुसरी मोटार घेतली व बंद पडलेली मोटार दुरूस्त करून मुंबईला पाठविण्याची विनंती केली.

मोटारीने मुंबईत पवार यांच्या "रामटेक' बंगल्यावर रात्री पोचलो. जेवण-खाण झाल्यानंतर पहाटेपर्यंत अगरवालांची उर्दू शायरी, धनाजी जाधवांच्या विनोदी गप्पा आणि श्रीनिावास पाटलांच्या लावण्यांनी रंग आणला. पहाटे सारे झोपी गेले. सकाळी उशीरपर्यंत आम्ही सारे झोपेत होतो. मात्र, पवार यांनी लवकर उठून बंगल्यातील आपल्या कार्यालयात काम सुरू केले. आदल्या दिवशीच्या प्रवासाने मी पुरता कंटाळलो होते. सारे अंग पुरते दुखत होते.

सकाळी उठण्याची अजिबात माझी इच्छा नव्हती. मात्र, सरकारी नोकर असल्याने श्रीनिवास पाटील यांना पिंपरीला लवकर पोचावचे होते. त्यामुळे मला उठवऱ्याची त्यांची घाई होती. काही केल्या मी उठत नव्हतो. त्यामुळे माझी तक्रार करीत पाटील यांनी पवारांना माझ्या खोलीत आणले. हाक मारूनही मी उठत नसल्याचे पाहून पवार थेट माझ्या पाठीवर उभे राहिले.

त्यांच्या 90 किलोच्या ओझ्याने एका क्षणात माझी झोप आणि आळस कुठच्या कुठे पळून गेला. मी अक्षरश: विव्हळत उठलो. माझी अवस्था पाहून सारेच हसत राहिले. मला काही सुचेना. त्यातही पवार मिश्‍किलपणे म्हणाले, "उद्योगमंत्री असल्याने उद्योजकाची थोडी सेवा केली.'' पवारांच्या या मिश्‍किलपणाचे सर्वांनाच कौतुक वाटले. साऱ्यांनी हास्याचे फवारे पुन्हा उधळले. मी मात्र. त्या ओझ्याने आणखीच विव्हळत होतो.
(Edited  by : Mangesh Mahale)  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख