Therefore Rajan Patil is not celebrating his birthday | Sarkarnama

...म्हणून राजन पाटील वाढदिवस साजरा करत नाहीत 

संपत मोरे 
रविवार, 5 जुलै 2020

लोकांनी जेव्हा मला आमदार म्हणून निवडून दिले, तेव्हा मी ठरवले. इथूनपुढे आपण वाढदिवस साजरा करायचा नाही. कारण, लोकांनी आमदार केले, याच मोठ्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याहून मोठ्या शुभेच्छा कोणत्या? म्हणून मी माझा वाढदिवस साजरा करत नाही.

पुणे : लोकांनी जेव्हा मला आमदार म्हणून निवडून दिले, तेव्हा मी ठरवले. इथूनपुढे आपण वाढदिवस साजरा करायचा नाही. कारण, लोकांनी आमदार केले, याच मोठ्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याहून मोठ्या शुभेच्छा कोणत्या? म्हणून मी माझा वाढदिवस साजरा करत नाही,' असे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले. 

राजन पाटील यांचा शनिवारी (ता. 4 जुलै) वाढदिवस होता. सोशल मीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, नवाब मलिक यांनीही ट्विट करून पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

माजी आमदार राजन पाटील म्हणाले,"लोकांनी मला मोहोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून दिले. मला मतदानाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा ह्याच माझ्यासाठी थोर होत्या. त्याची तुलना कोणत्याही शुभेच्छाशी करता येणार नाही. त्यामुळे मी ठरवले आता आपण यापुढे वाढदिवस साजरा करायचा नाही. वाढदिवस असला की कार्यकर्ते हार घेऊन येतात. फेटे, शाली घेऊन येतात.

'संपूर्ण मोहोळ तालुक्‍यातील लोक आपला कामाचा वेळ शुभेच्छा द्यायला वाया घालवतात. काही कार्यकर्त्यांची परिस्थिती प्रतिकूल असते, तरीही ते खर्च करतात. असा खर्च करायला लावणे बरोबर नाही. आपल्या मनाला ते पटत नाही. मी माझ्या वाढदिवसानिमित्त तालुक्‍यात एकही डिजिटल पोस्टर लावून देत नाही,' असेही माजी आमदार पाटील म्हणाले. 

"वाढदिनी मी सकाळी लवकर उठून आई-वडिलांच्या फोटोचे दर्शन घेतो. गावातील ग्रामदैवत आणि शेतातील महादेवाचे दर्शन घेतो. माझी आई माझ्या जन्माच्या अगोदरपासून दररोज पायी महादेवाच्या दर्शनाला जायची. एकही दिवस तिच्या साधनेत खंड पडला नाही. वयाच्या 94 व्या वर्षांपर्यत ती देवाला जात होती. माझ्या वाढदिनी मीही महादेवाला जातो. माझ्या गावातील वयस्कर लोक मला महादेव या नावाने ओळखतात,' अशीही आठवण पाटील यांनी सांगितली. 

"वाढदिवस साजरा करणे माझ्या मनाला पटत नाही. गेल्या 35 वर्षांपासून मी हा पायंडा पाडला आहे. आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या शुभेच्छा नेहमीच आपल्या सोबत असतात, पण त्यासाठी वाढदिवस कशाला' असेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख