बारामतीतील दिग्गज नेते पोपटराव तुपे यांचे निधन

तालुक्यातील दिग्गज नेते व बारामती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष पोपटराव मानसिंग तुपे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बारामती सहकारी बँकेच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते.
Popatrao Tupe
Popatrao Tupe

बारामती :  तालुक्यातील दिग्गज नेते व बारामती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष पोपटराव मानसिंग तुपे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बारामती सहकारी बँकेच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. कृषी उत्पन्न बाजार समिती, मर्चंटस असोसिएशन, माळेगाव सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन या संस्थांचे संचालक म्हणून त्यांनी कामकाज केले. बारामती नगरपालिकेवर नगरसेवक म्हणूनही ते निवडून गेले होते. 

सन १९८२ ते १९८५, तसेच १९८५ ते १९९५ व १९९५ ते २००५ असे जवळपास २३ वर्षे त्यांनी बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांचे वडील मानसिंगराव तुपे हे या बँकेच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनीही बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. 

बारामतीच्या राजकारणात अजित पवार यांच्याखालोखाल त्यांना स्थान होते. मात्र २००४ मध्ये तुपे यांनी अजित पवार यांच्यापासून फारकत घेत शिवसेनेच्या तिकीटावर बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली. मात्र अजित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. त्या काळापासून तुपे अजित पवारांपासून दुरावले होते. मात्र नंतरच्या काळात पुन्हा पवार यांनी तुपे यांना राष्ट्रवादीत सामावून घेतले. 

मात्र या निवडणुकीनंतर तुपे यांचे बारामतीच्या राजकारणातील महत्व काहीसे कमी झाले. मात्र तरिही अजित पवार यांनी तुपे यांच्या मुलाला बारामती बँकेच्या संचालक पदावर सामावून घेतले. तुपे यांचा पवार विरोध मावळल्यानंतर राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहात ते पुन्हा सहभागी झाले. मात्र या निवडणूकी अगोदरपर्यंत अजित पवार यांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून त्यांना मान्यता होती. 

१९९९ मध्ये चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्याविरोधात बारामतीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोपटराव तुपे यांनी पवार यांच्या बाजूने आपली सर्व ताकद पणाला लावली. 

या निवडणूकीमध्ये तुपे यांच्यावरच पवार यांच्या निवडणूकीची जबाबदारी होती. बारामती सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेकांना व्यवसायासाठी तसेच व्यापारासाठी त्यांनी अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले. बारामतीसह राज्याच्या कानाकोप-यात लोकांना या बँकेविषयी आपुलकी निर्माण करुन देण्यामध्ये तुपे यांचा मोठा वाटा होता. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती, शहरातील व्यापारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com