काकडेंच्या निंबुतमध्ये प्रथमच पवार गटाचा सरपंच 

पन्नास वर्षांत काकडे गटाकडून अनेक संस्था पवारांनी ताब्यात घेतल्या. मात्र निंबुतमध्ये (स्व.) बाबलाल काकडे यांच्यानंतर शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी एकहाती सत्ता राखली होती.
Sarpanch of Pawar group for the first time in Kakade's Nimbut village
Sarpanch of Pawar group for the first time in Kakade's Nimbut village

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : बारामती तालुक्‍यातील निंबुत (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच पवार गटाच्या विचारांचा सरपंच खुर्चीवर विराजमान झाला आहे. सरपंचपदाचे आरक्षण असलेला अनुसूचित जमातीचा महिला उमेदवार निवडून आणण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनेलला यश आले होते. या विजयामुळे निर्मला संतोष काळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली, तर विरोधी गटाचे अमरदीप चंद्रशेखर काकडे हे दुसऱ्यांदा उपसरपंचपदी विराजमान झाले. 

ग्रामपंचायतीच्या 1962-63 च्या स्थापनेपासून निंबुतची सत्ता निर्विवादपणे काकडे गटाकडे होती. सन 1960-67 पासूनच काकडेंच्या विरोधात पवार गट तालुक्‍यात तयार झाला. पन्नास वर्षांत काकडे गटाकडून अनेक संस्था पवारांनी ताब्यात घेतल्या. मात्र निंबुतमध्ये (स्व.) बाबलाल काकडे यांच्यानंतर शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी एकहाती सत्ता राखली होती. यावेळीदेखील सतीश काकडे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलला पंधरापैकी नऊ जागांवर बहुमत मिळाले होते. 

राष्ट्रवादीचे युवा नेते गौतम काकडे यांच्यासह सोमेश्वर कारखान्याचे संचालक महेश काकडे, माजी उपसरपंच उदय काकडे, धैर्यशील काकडे, शशिकांत काकडे, सुजित काकडे, राजेंद्र काकडे आदींच्या सोमेश्वर पॅनेलने कडवी लढत देत सहा जागा प्राप्त केल्या होत्या. विरोधकांना प्रथमच इतक्‍या जागा मिळाल्या. सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, माजी संचालक बी. जी. काकडे, माजी उपाध्यक्ष दिलीप फरांदे, विजय काकडे आदींनी मार्गदर्शन केले होते. 

हा "सोमेश्वर' पॅनेल अल्पमतात असला तरी अनुसूचित जमातीच्या उमेदवार निर्मला काळे यांना चांगल्या मतांनी निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले. भैरवनाथ पॅनेल नेमका यातच अपयशी ठरला. सरपंचपदासाठी अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी पडलेल्या आरक्षणाला सतीश काकडे यांनी न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे निंबुतसह तालुक्‍याची सरपंच निवड लांबवणीवर पडली होती. नुकताच न्यायालयाने निवडीला हिरवा कंदील दाखवल्याने निवडी पार पडल्या असून पुढील सुनावणी 16 मार्चला होणार आहे. 

निवडीप्रसंगी सोमेश्वर पॅनेलच्या निर्मला काळेंचा एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध निवड गेल्या. तर उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत भैरवनाथचे अमरदीप काकडे यांनी गुप्त मतदान पद्धतीत नऊ-पाच असा विद्यादेवी काकडे यांचा पराभव केला. एक मत बाद ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत मिसाळ यांनी काम पाहिले, तर सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, दशरथ बालगुडे, मधुकर खोमणे यांनी सहकार्य केले. 

या निवडीने वंचित घटकातील महिलेला निंबुतसारख्या राज्यात नावाजलेल्या गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, हे लोकशाहीचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे. निवडीनंतर सोमेश्वर पॅनेलले जल्लोषात सत्तापरीवर्तन साजरे केले. पॅनेलप्रमुख गौतम काकडे यांनी, यापुढे पवारसाहेब व अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्वसामान्य नागरिकांचा, गावाचा विकास करण्यास कटीबद्ध राहू, अशी ग्वाही दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com