Ramesh Bagwe, Abhay Chajed and Aba Bagul Want Council Ticket from Congress
Ramesh Bagwe, Abhay Chajed and Aba Bagul Want Council Ticket from Congress

पुण्यातून 'या' तीन नेत्यांना व्हायचंय आमदार

कॉंग्रेसच्या वाट्याला आघाडीत एक जागा निश्‍चित आहे. दुसरी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या जागांवर राज्य व देश पातळीवर काम करणारे अर्ध्या डझनाहून अधिक नेते इच्छुक आहेत.त्यामुळे या स्पर्धेत पुण्यातील या नेत्यांना कितपत संधी मिळते याबाबत साशंकता आहे

पुणे : कॉंग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांवर पुण्यातून शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. कॉंग्रेसच्या वाट्याला आघाडीत एक जागा निश्‍चित आहे. दुसरी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या जागांवर राज्य व देश पातळीवर काम करणारे अर्ध्या डझनाहून अधिक नेते इच्छुक आहेत.त्यामुळे या स्पर्धेत पुण्यातील या नेत्यांना कितपत संधी मिळते याबाबत साशंकता आहे.

जागा एक-दोन आणि इच्छुकांची संख्या मोठी ही परिस्थिती कायम असते. मात्र, पुण्यातील या तीनही नेत्यांना आमदारकी मिळायला हवी, अशी त्यांची क्षमता आणि काम आहे. बागवे हे अनेक वर्षे नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी पाचवेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षाच्या कठीण काळात गेली जवळपास पाच वर्षे ते शहराध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. राज्याचे गृह राज्यमंत्री म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे. मातंग समाजाला सत्तेत स्थान मिळाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघातील तसेच राज्यातील बहुसंख्य मातंग समाज कॉंग्रेसच्या पाठीशी कायम उभा आहे. त्यामुळे मला संधी दिली तर या समाजाला स्थान मिळाल्यासारखे होईल, अशी भूमिका शहराध्यक्ष बागवे यांनी मांडली.

दुसरे इच्छुक आबा बागूल गेली ३० वर्षे महापालिकेत नगरसेवक आहेत. गेल्या ३५ वर्षापासून पक्षाचे काम करीत आहेत. पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क आहे. महापालिकेतील विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. गेल्या तीस-पस्तीश वर्षातील कामाची दखल म्हणून पक्षाने आमदारकी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

तिसरे इच्छुक अभय छाजेड महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक व पदाधिकारी राहिले आहेत.विधानसभा निवडणूकदेखील त्यांनी लढविली आहे. पुण्याचे सलग अकरा वर्षे ते शहराध्यक्ष होते. पक्षाचा शहरातील चांगला चेहरा अशी त्यांची प्रतिमा आहे.राज्यातीलच नव्हे तर देश पातळीवरील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. प्रत्येकाच्या बाबतीत त्यांचे टीकाकार उणे-अधिक सांगू शकतील. मात्र, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर या तिघांनाही पक्षाने संधी द्यावी, अशी त्यांचे काम आहे.

राज्यातही अनेक इच्छुक 

मात्र, पक्षात राज्य व देश पातळीवर काम करणारे अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे संधी मिळणार की नाही याबाबत साशंकता अधिक आहे. कॉंग्रेसच्या हिमाचल प्रदेशच्या प्रभारी रजनी पाटील, अशिष देशमुख, अरिफ नसीम खान, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यापर्यंत इच्छुकांची मोठी यादी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com