राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची त्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता  - Raju Shetty, Sadabhau Khot acquitted of Malegaon factory agitation | Politics Marathi News - Sarkarnama

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची त्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता 

मिलिंद संगई 
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

या काळात तोडफोड करण्यासह वाहनांचे नुकसान व चिथावणीखोर भाषणांबद्दल 27 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्यासह 26 जणांची मंगळवारी (ता. 2 फेब्रुवारी) 2012 मध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 

बारामती तालुक्‍यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर 2012 मध्ये राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी दरवाढीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या काळात तोडफोड करण्यासह वाहनांचे नुकसान व चिथावणीखोर भाषणांबद्दल 27 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. 

या 27 जणांपैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्या नंतर 2014 मध्ये पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. साक्षी, पुराव्यांची तपासणी झाल्यानंतर सबळ पुराव्यांअभावी या सर्वांचीच चौथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. गिऱ्हे यांनी आज निर्दोष मुक्तता केली. ऍड. राजेंद्र काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत व इतरांच्या बाजूने कामकाज पाहिले. 

नजरानजरही टाळली 

आजच्या न्यायालयीन कामकाजाप्रकरणी राजू शेट्टी व सदाभाऊ खोत अनेक दिवसांनंतर समोरासमोर आले होते. दुपारच्या सत्रात दोघेही एकत्र येऊन त्यांनी संवाद साधणे तर दूरच एकमेकांकडे कटाक्षही टाकला नाही, ही बाब उपस्थित सर्वांच्याच निदर्शनास आली. सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राजू शेट्टी यांच्या प्रश्नावर संयमी भूमिका घेतली. राजू शेट्टी यांनी मात्र असंगाशी संग करणार नाही असे सांगत समेटाची शक्‍यता फेटाळून लावली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख