चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षाच्या घरी राज ठाकरे जेवायला जाणार   - Raj Thackeray will go for dinner at the house of party workers | Politics Marathi News - Sarkarnama

चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षाच्या घरी राज ठाकरे जेवायला जाणार  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 जुलै 2021

ती इच्छा पूर्ण करण्याची संधी राज यांनी आपल्या मनसैनिकांसाठी खुली केली आहे.

पुणे : ज्या शाखेचा अध्यक्ष जोमाने चांगले काम करेल, त्याच्या घरी मी स्वतः जेवायला येईन, अशी कार्यकर्त्यांना हवीहवीशी संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष वाढीचे काम अधिक जोमाने करण्याचा सल्ला दिला. (Raj Thackeray will go for dinner at the house of party workers)  

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे राज्यातील विविध शहराच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकचा दौरा केला. त्या ठिकाणची विस्कटलेला घडी पुन्हा बसविण्याचा प्रयत्न राज यांनी केला. नाशिकच्या दौऱ्यानंतर ठाकरे हे आज (ता. १९ जुलै) सकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. ते तीन दिवस पुण्यात असणार आहेत.

हेही वाचा : एखादी जागा हरलो तरी चालेल, पण, कमिटमेंट तोडणार नाही : फडणवीस

पुण्यात दाखल होताच त्यांनी शहरातील सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व पदाधिकारी चार्ज व्हावेत, यासाठी राज ठाकरे यांनी एक आणखी संधी उपलब्ध करून दिली आहे. कोणत्याही कार्यकर्त्याची  आपला नेता आपल्या घरी जेवायला यावा, अशी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्याची संधी राज यांनी आपल्या मनसैनिकांसाठी खुली केली आहे.
 
पुण्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की यापूर्वीच्या प्रभाग अध्यक्षांची नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना संधी दिल जाणार आहे. ज्या शाखेचा अध्यक्ष पक्षाचं काम अधिक जोमाने चांगल्या पद्धतीने करेल, त्या शाखेच्या अध्यक्षाच्या घरी जेवयाला जाणार आहोत. तसेच, मी महिन्यातील तीन दिवस पुण्यात येऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहे, असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे यांनी दिली. 

पुणे शहरातील विधानसभेच्या आठही मतदारसंघातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे या तीन दिवसांत संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी सोमवारी (ता. १९ जुलै) शहरातील इंद्रप्रस्थ सभागृहात राज यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी कामाला लागावे. पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवावोत, त्यातून पक्षवाढीचे काम सकारात्मक पद्धतीने करावे, असे आवाहनही त्यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केले आहे, असेही मोरे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख