पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणणार : अजित पवार  - NCP will bring power in Pune Municipal Corporation: Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणणार : अजित पवार 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आम्ही या वेळी सत्ता खेचून घेणार आहोत. 

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ता खेचून आणेल, असे सांगून महापालिकेत पक्षाची सत्ता असेल, असा विश्‍वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात व्यक्त केला. 

भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेतील विविध विकास कामांचा आढावा गुरुवारी (ता. 11 फेब्रुवारी) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानंतर फडणवीस यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना चांगले काम केल्याची पोचपावती दिली. तसेच, आगामी निवडणुकीतही भाजपचीच सत्ता येईल, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता. त्याबाबत पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. 

पुणे महापालिकेतील योजनांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर पवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील लोक "पुन्हा आमची सत्ता येणार' असे म्हणतात, तर विरोधी पक्षातील लोक "आम्ही सत्ता खेचून आणणार' असे म्हणतात. त्यानुसार महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आम्ही या वेळी सत्ता खेचून घेणार आहोत. 

पडळकरांचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी 

भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे शरद पवार यांच्यासंदर्भातील वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. प्रमुख पक्षाचे उमेदवार असूनही ज्यांचे निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले, अशांना जास्त महत्त्व देऊ नये. ज्यांना लोकांनी नाकारले, त्यांची एवढी काय नोंद घेता? त्यांना फारसे महत्व देण्याचे कारण नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडळकर यांच्यावर टीका केली. 

पुरंदर तालुक्‍यातील जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्या (ता. 13 फेब्रुवारी) होणार आहे. तत्पूर्वीच आज पहाटेच आमदार पडळकर यांनी कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर जाऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमदार पडळकर यांनी पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. याबाबत पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी पडळकर यांच्यावर सडकून टीका करत त्यांना फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही, असे सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख