...अन्‌ राज्यमंत्र्यांनी हातात झाडू घेतला  - Minister of State Dattatreya Bharane took part in the clean-up operation | Politics Marathi News - Sarkarnama

...अन्‌ राज्यमंत्र्यांनी हातात झाडू घेतला 

राजकुमार थोरात
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

या मोहिमेला राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्वतः सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे. 

वालचंदनगर (जि. पुणे) : वेळ सकाळची अकराची...राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या गाड्यांचा ताफा इंदापूर तालुक्‍यातील वालचंदनगरच्या जुन्या बसस्थानकाजवळ येऊन थांबतो... राज्यमंत्री गाडीतून उतरून हातात झाडू घेवून स्वच्छता मोहिमेस सुरूवात करतात.. राज्यमंत्र्यांनी प्लॉस्टिक कचराही उचलला आणि स्वच्छ वालचंदनगर-सुंदर वालचंदनगर करण्याचा संदेश दिला. 

वालचंदनगर ग्रामपंचायतीचे विद्यमान नवनिर्वाचित सदस्य आणि माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड यांच्या संकल्पनेतून वालचंदनगरमध्ये स्वच्छता मोहिमेची सुरुवात राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आली. 

गेल्या सहा-सात महिन्यांपासून वालचंदनगरमध्ये अनेक बदल होत आहेत. नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वालचंदनगर ग्रामपंचायतीबरोबरच वालचंदनगर कंपनीचे प्रशासनही प्रयत्नील आहे. वालचंदनगरचे नाव राज्याच्या व देशाच्या नकाशावर या कंपनीमुळे झळकत आहेत. वालचंदनगरचा परिसर स्वच्छ व सुंदर असावा, असे सर्व नागरिकांना वाटत असते. मात्र, नागरिक अनेकवेळा स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे हर्षवर्धन गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरवात केली आहे. या मोहिमेला राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्वतः सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे. 

या वेळी राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले की, स्वच्छतेमुळे शहराची, गावाची वेगळी ओळख निर्माण होत असते. समाजातील प्रत्येकाने आपल्या परिसराची स्वच्छता केल्यास स्वच्छता मोहिम व्यापक होईल. स्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मोलाची मदत होणार आहे. त्यामुळे युवकांनी आठ दिवसांमधून एकदा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्याचे आवाहनही राज्यमंत्री भरणे यांनी या वेळी केले. 

हेही वाचा : पवारांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचा जयंत पाटलांनी घेतला समाचार 

अकोला : कोरोना काळातील वाढीव वीजबिल माफीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अकोला येथे उत्तर देताना राज ठाकरे प्रसिद्धीसाठी असे बेफाम आरोप करीत असल्याचा पलटवार केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे फासे पलटण्याच्या विधानातही गांभीर्य नसल्याचे पाटील यांनी सांगितले. 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी (ता. 7 फेब्रुवारी) अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागांतर्गत अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऊर्जामंत्री राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळात वीजबिल माफी संदर्भात आश्वासन दिल्यावर घूमजाव केले. याबाबत राज ठाकरे यांनी त्यासाठी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. याबाबत विचारले असता पाटील यांनी राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची गरज असल्याने ते अशाप्रकारे बेफाम वक्तव्य करीत असल्याचे म्हटले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी सत्तांतरणाच्या अनुषंगाने फासे पलटण्याचे विधान केले होते. यावर फडणवीस यांना मी गांभीर्याने घेत असलो तरी त्यांच्या अशा विधानांना मात्र गांभीर्याने घेत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख