मृत्यूशी झुंजत असतानाही परिचारकांचा बैलपोळ्याचा हप्ता देण्याचा आदेश 

मागील महिन्यात सुधाकर परिचारक, आमदार प्रशांत परिचारक आणि त्यांचे बंधू उमेश परिचारक यांच्यासह कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
That memory of Sudhakar Paricharak brought tears to the eyes of the farmers
That memory of Sudhakar Paricharak brought tears to the eyes of the farmers

पंढरपूर : पंढरपूरचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे 17 ऑगस्ट रोजी कोरोनामुळे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. पण, उपचार घेत असतानाही आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचाच विचार केला.

कारण, ते उपचार घेत होते, तेव्हा बैलपोळा तोंडावर आला होता. सोलापूर जिल्ह्यात बैलपोळ्याला उसाचा हप्ता देण्याचा रिवाज त्यांनी सुरू केला होता. तो मोडू नये आणि कायम शेतकरीहिताचा विचार डोक्‍यात असल्याने परिचारक यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांना फोन करून पोळ्याचा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, असा आदेश त्यांनी दवाखान्यातून दिला होता. 

त्या आठवणीने आज (ता. 11 सप्टेंबर) पंढरपूर येथील परिचारक वाडा गलबलून गेला होता. मागील महिन्यात सुधाकर परिचारक, आमदार प्रशांत परिचारक आणि त्यांचे बंधू उमेश परिचारक यांच्यासह कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

त्यात सुधाकर परिचारक हे पुण्यात उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले. कुटुंबातील काही सदस्य रुग्णालयात, तर काही सदस्य क्वारंटाइन होते. त्यामुळे (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर कार्यकर्ते, जिल्ह्यातील मान्यवर परिचारक कुटुंबातील सदस्यांना भेटू शकले नव्हते. 

परिचारक कुटुंबातील सर्वांचा क्वारंटाइन काळ संपल्यानंतर गुरुवारी (ता. 10 सप्टेंबर) आमदार प्रशांत परिचारक पंढरीत दाखल झाले. आल्यानंतर त्यांनी कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरी उपलब्ध असेन, असे जाहीर केले होते. त्यानुसार आज (ता. 11 सप्टेंबर) पहिल्याच दिवशी वाड्याबाहेर त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

या वेळी आमदार परिचारक यांनी सुधाकर परिचारक यांनी शेवटच्या क्षणी दिलेल्या निरोपाची आठवण सांगितली. ते म्हणाले की सुधाकरपंत परिचारक हे पुण्यात उपचार घेत असताना बैलपोळ्याचा सण तोंडावर येऊन ठेपला होता.

पोळ्याला उसाचा हप्ता देण्याचा रिवाज सोलापूर जिल्ह्यात त्यांनी सुरू केला होता. तो मोडू नये; म्हणून त्यांनी शेवटच्या क्षणी चालकाच्या फोनवरून पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांना बैलपोळ्याचा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. कोरोना काळात कोणालाही अडचण येऊ नये, त्यादृष्टीने नियोजन करा, असा आदेश दिला होता. हे ऐकून उपस्थितींना आश्रू अनावर झाले. 

बैलपोळाला उसाचा हप्ता देणारा पांडुरंग कारखाना जिल्ह्यातील एकमेव कारखाना आहे. पूर्वी इतर कारखानेही हप्ता द्यायचे. परंतु इतर कारखाने आता तो हप्ता देत नाहीत. पांडुरंग कारखान्याने मात्र ती प्रथा अजूनही जपली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com