शरदरावांनी न मागता मला सगळं दिलं अन बायकोला शारदाबाईंनी पाटावरच्या चपात्या शिकविल्या

भरला अर्ज, समोर माझ्याविरोधात ‘राजा’ उभा. लोकं डोळं वटारून बघायची.
Memories with Pawar family awakened by Srinivas Patil
Memories with Pawar family awakened by Srinivas Patil

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : ‘‘पवार कुटुंबीयांशी मी गेली ६३ वर्षे जोडलेला आहे; पण कधीही काहीही मागितलं नाही. नागपूरला कलेक्टर होतो. शरद पवारांनी बोलावून घेतलं आणि म्हणाले ‘राजीनामा दे.’ देऊन टाकला. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही चांगला गरिबांसारखा घरी बसलो होतो. बोलावून घेतलं आणि म्हणाले, ‘कागदं गोळा कर. अर्ज भर’ भरला अर्ज, समोर माझ्याविरोधात ‘राजा’ उभा. लोकं डोळं वटारून बघायची. आलो की निवडून!’’ अशा शब्दांत खासदार श्रीनिवास पाटील यांनी पवार कुटुंबीयांसोबतचे मैत्र तर उलगडलेच. पण, साताऱ्यात श्रीनिवास पाटील विरूद्ध उदयनराजे अशा झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीची आठवणही करून दिली. 

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर येथे ‘राजमाता जिजाऊ आदर्श पुरस्कार समिती’च्या वतीने (स्व.) शारदाबाई पवार यांच्यासह अंजनाबाई पुंडलिक लहाने, प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे, (स्व.) नर्मदाबाई गोविंदराव सोरटे, सुमन विठ्ठलराव शेंडकर, शालन रामभाऊ गिरमकर, सुमन महादेव वायकर, सहारा निजाम मुलाणी, मिनल भरतकुमार शहा, रुक्मिणी अशोक जगताप, सिंधू मारुती ननावरे या महिलांना राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्काराने श्रीनिवास पाटील, शरद पवार यांच्या भगिनी नीलाताई सासणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

या प्रसंगी पाटील यांनी शारदाबाई पवार यांच्याबद्दलच्या आठवणी व्यक्त करताना पवार कुटुंबीयांशी असलेले घट्ट ऋणानुबंधही उलगडले. ‘आम्ही पुण्यात शिकायला होतो. माझी सायकल मोडकी होती. त्यात डबलसीट फिरण्यासाठी मोठं कॅरेज बनविलं होतं. शारदाबाई पाच कप्प्याचा भलामोठ्ठा डबा पाठवायच्या, तो सायकलवरून आणायचो. पवार मंडळी बारकी नव्हतीच!

दिनकरराव पवार तर एकटे मोटारसायकल उचलायचे. वसंतराव पवार अत्यंत गोड माणूस आणि निष्णात वकील होते. अनंतराव पवार तुलनेने रांगडे गडी पण उत्तम वाचक. अतिशय हुशार होते. पहिल्या दिवशी कॉलेजातून बाहेर काढलेला हा माणूस. पण, व्ही. शांताराम यांच्या स्टुडिओत जी चित्र सुंदर आहेत, ती अनंतराव यांनी काढलेली आहेत,’ असे पाटील यांनी सांगितले. 

‘‘शरदराव आणि आम्ही बारामतीत राहायला असताना कालव्यात उड्या मारायचो. रात्रीची भुताटकी खेळायचो. त्यातूनच भूता परस्परे जडौ मैत्र जीवांचे हे सूर जुळले. माधवरावांना शारदाबाईंनी फक्त तिकीट काढून दिलं. ‘पुढचं तुझं तू बघ’ असं सांगितलं. ते इंग्लडला जाऊन रेल्वे स्टेशन, पोलिस स्टेशनला राहिले. चिकाटीने शिकले.

शारदाबाई पवारांच्या उशीखाली हमखास पुस्तक वाचायला मिळायचं, त्यामुळं सगळं कुटुंबच आपापल्या क्षेत्रात निष्णात झालं. गोविंदराव म्हणजे घट्ट उभं झाड आणि शारदाबाई म्हणजे झाडाभोवतीची वेल. त्या पुरोगामी विचाराच्या होत्या. कुणी मोकळ्या हाताने परत जायचं नाही. आता पवार कुटुंबीयांची चौफेर प्रगती बघायला त्या नाहीत. पवार मुख्यमंत्री झाले, ते पहायला त्या नव्हत्या,’’ अशा आठवणी पाटील यांनी सांगितल्या.  

माझा मोठा सत्कार आपोआप होत असतो, त्याचं कारण शरद पवार! ‘आदरणीय राष्ट्रीय नेते, माजी संरक्षणमंत्री, माजी केंद्रीय कृषिमंत्री, माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा सत्कार' असे कार्यक्रम होतात. आणि अध्यक्षस्थानी कोण असतो, तर श्रीनिवास पाटील!

शरद पवारांमुळे मला हे मिळाले. मी कधी काही मागितलं नाही. मी नागपूरला कलेक्टर होतो. एक दिवस फोन आला. म्हणाले, ‘सकाळी भेटायला ये.’ चांगला सूटबूट घालून गेलो, तर ते म्हणाले, ‘‘जा, राजीनामा देऊन ये.’’ मी काय कारण? कशासाठी? असं काहीही विचारलं नाही. दिला राजीनामा. तिसऱ्या दिवशी मंजूर झाला. पुन्हा भेटून विचारलं, आता काय करायचं? तर म्हणाले, ‘‘जा पाच सहा खादीचे शर्ट, इजार, टोपी घालून ये.’’ मी पण गेलो की. इतका हुबेहूब पुढारी ड्रेस जमला की त्यांनीच मला ओळखले नाही, अशा गमतीजमतीही पाटील यांनी सांगितल्या. 

प्रशांत सातव यांनी प्रास्ताविक केले. विक्रम ननावरे यांनी सूत्रसंचालन केले, तर संगीता काकडे यांनी आभार मानले.

पाटावरची चपाती

दोन-चार जण जेवतील, अशी भलीमोठी भाकरी बाई सहज करायच्या. माझे लग्न झाल्यावर बायको नाजूक चपात्या करायची. बाई म्हणाल्या, ‘‘हिकडं ये तुला शिकवते.’’ बाईंनी पाट घेतला आणि संबंध पाटावर चपाती लाटली. म्हणाल्या, ‘‘कव्हर चपात्या करत बसणार?’’ माझ्या बायकोला अजून पाटावर चपाती लाटता येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com